नागपूर (हिं.स.) : मॉईल एक नवरत्न कंपनी असून देशात गरजेपेक्षा कमी मँगनीजचे उत्पादन आहे. मँगनीजच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मॉईलमध्ये काम करणा-या कामगारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मँगनीज ओर इंडिया कंपनीतील कामगार संघटनांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मॉईलचे व्यवस्थापकीय संचालक चौधरी, तानाजी वनवे, योगेश वाडीभस्मे, रामअवतार देवांगन आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, विदर्भ, महाराष्ट्र, नागपूरचा विकास व्हावा, युवकांना काम मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा या भावनेतून विकास व्हावा. मॉईल ही एक रत्नांची कंपनी असून या कंपनीच्या प्रगतीचे, विकासाचे श्रेय कामगारांना आहे. आज ८० लाख टन मँगनीजची देशाला गरज आहे. यापैकी ३० लाख टनचे आपले उत्पादन आहे. ५५ लाख टन मँगनीज आपण आयात करतो. ही आयात बंद झाली पाहिजे यासाठी मँगनीजचे उत्पादन वाढवावे यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मँगनीजचा साठा आज कमी आहे. कारण उत्पादन कमी आहे. जर उत्पादन वाढले तर रोजगार मिळेल. नफा जास्त होईल व कंपनीची प्रगती होईल. यासाठी मँगनीजच्या जास्तीत जास्त खाणी सुरु व्हावा असे सांगताना गडकरी म्हणाले – ११ खाणींजवळ ११ स्मार्ट व्हिलेज तयार व्हावेत. येथे कामगारांना आरोग्य, शैक्षणिक व अन्य सर्व सुविधा मिळाव्या. युनियनच्या नेत्यांनी ट्रेड युनियनचे काम करताना सर्वांचे हित ज्यात आहे, अशा योजना आणाव्या. कामगारांच्या कल्याणाच्या योजनाही आणाव्या. संघटना कोणत्याही झेंड्याखाली काम करोत, पण कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही गडकरींनी केले.