अॅड. रिया करंजकर
भारताकडे इतर देश अभिमानाने बघतात, ते कारण म्हणजे भारतात असलेली कौटुंबिक संस्था. या कौटुंबिक संस्थांमुळे आज भारत देशामध्ये परंपरा रितीरिवाज संस्कृती पाळली जात आहे. कुठल्या देशात नाही, तेवढे सण भारतात साजरे केले जातात म्हणून भारत देश इतर देशांपेक्षा कौटुंबिक संस्थेमुळे वेगळा ठरला जातो. पाश्चिमात्य देशाची संस्कृती भारतातील नवीन पिढी आत्मसात करू लागलेली आहे. याची सुरुवात विभक्त कुटुंब पद्धतीने सुरू झाली आणि आज ती लिव्ह इन रिलेशनशिप यावर येऊन ठेपलेली आहे. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात होते. जसे तिचे फायदे असतात, तसे तिचे तोटेही असतात. पण हे तोटे कधी कधी आपल्या आयुष्याशी संबंधित ठरतात.
श्यामल ही सामान्य स्त्री पण चंचल वृत्तीची आणि ही चंचल वृत्ती तिला घातक ठरली. आई-वडिलांनी चंचल वृत्तीच्या श्यामलाचा विवाह आपल्याच नात्यातील युवकांशी करून दिला. काही दिवस संसार सुरळीत चालू होता. पण श्यामलचं मन काही त्या संसारात रमेना म्हणून तिने आपल्या पतीला सोडून दिले. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. या गोष्टीची कल्पना तिला नव्हती. त्याच वेळी तिला नरेश हा युवक आवडायला लागला आणि तो तिच्या घरी येत जात होता. श्यामलने आपल्या पतीला सोडलेलं होतं. त्याची कल्पना नरेशला होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं. पण श्यामलला संसारात अडकून राहायचं नव्हतं. म्हणून त्या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं ठरवलं. पण ही गोष्ट नरेशच्या कुटुंबाला पसंत नव्हती म्हणून नरेशने आपल्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडून तो कायमचा श्यामलकडे जाऊन राहू लागला. याच काळामध्ये श्यामलला आपण पहिल्या पतीपासून गरोदर असल्याची जाणीव झाली. त्यावेळी नरेशने आपलं नाव देण्याचं ठरवलं. पण नरेश काही कामधंदा न करणारा व अनेक व्यसने असलेला युवक होता. त्यामुळे श्यामल अनेक घरचे घरकाम करून आपला आणि नरेशचा उदरनिर्वाह चालवत होती. लिव्ह इन रिलेशनशिप नवीन असल्यामुळे, म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं या दोघांच्या बाबतीत घडू लागलं. नरेश काहीच कामधंदे करत नाही, आपल्या जीवावर तो जगत आहे, याचा संताप श्यामलला येऊ लागला व त्यामुळे त्या दोघांमध्ये बारीक-सारीक गोष्टीवरून भांडणं होऊ लागली. श्यामल कमावती होती. त्याच्यामुळे तिचा दरारा जास्त होता आणि ती कधी-कधी भांडणांमध्ये नरेशला मारतही होती. नरेश दारूच्या व्यसनामुळे हे सहन करत होता व कधी भांडण टोकाची झाली, तर तो आपल्या आई-वडिलांच्या घरी येऊन राहत होता व परत दोघांमधली भांडण शांत झाली की, परत श्यामलकडे जात होता. हे असंच अनेक वर्ष चालू होतं. याचा अर्थ असा होता की, नरेशला ठेवून घेतलेलं होतं. त्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामध्ये श्यामलने नरेशला खूप मारहाण केली. या गोष्टीचा संताप येऊन नरेश आपला आई-वडिलांकडे आला आणि चाकू घेऊन तो परत श्यामलकडे गेला व तिच्यावर त्याने वार केले. श्यामलला जखमी अवस्थेत शेजारच्यांनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं व नरेशच्या विरुद्ध पोलीस कम्प्लेंट दाखल झाली. श्यामल शुद्धीवर आल्यावर तिची जबानी घेऊन पोलिसांनी नरेश विरुद्ध बलात्कार, हाफ मर्डर अशी अनेक कलमे लावली व तो गेले चार महिने तुरुंगात खितपत पडलेला आहे.
नरेशची एकच चूक होती की, त्याने आई-वडिलांचं न ऐकता श्यामलबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिला होता. तिच्या पहिल्या पतीच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं होतं. पण तो काही कामधंदा करत नव्हता. श्यामलच्या जीवावर जगत होता. श्यामल चंचल वृत्तीची असल्यामुळे ती संसारात अडकून न राहणारी अशी स्त्री होती. त्यामुळे नरेशचा पाहिजे तेवढा फायदा उचलून, त्याला मारझोड करून गुन्हा करायला त्याला भाग पडलं व आज तो जेलमध्ये खितपत आहे. अशा रिलेशनशिपमध्ये कितीतरी जणांची आयुष्यं सुरुवात होण्याअगोदरच बरबाद होत चाललेली आहेत.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत.)