मृणालिनी कुलकर्णी
नवीन शालेय वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! बालक मोबाइलमधून बाहेर पडल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक सारेच खूश. बालवाडी ते दहावी हा बारा वर्षांचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यतील अत्यंत महत्त्वाचा. हा शालेय कालखंड अनेक गमतीजमतीने, कडू-गोड आठवणीने, चांगल्या-वाईट अनुभवाने भरलेला असतो. काहींना अभ्यासात रुची नसली तरी आपसातली मैत्री त्यांचा शालेय कालखंड आनंददायी करतो. प्रवाही असलेल्या शालेय कालखंडाचे प्रत्येक वर्ष कधी सुरू होते आणि कधी संपते हे कळतच नाही. शाळेच्या संपूर्ण युनिफॉर्मपासून शाळेत विद्यार्थ्यांच्या शिस्तीला सुरुवात होते. शालेय कालखंडात पालकत्वाची जबादारी मोठी असते. असेही ऐकले, विज्ञानाच्या मते मुलाच्या सात ते आठ वर्षेपर्यंत आयक्यू आणि ईक्यूची वाढ ८०% झालेली असते. राहिलेली २०% वाढ नंतर होते. बालवयात मिळालेली, दिलेली शिकवण दृढ होते म्हणून ‘बालकत्व’ पर्यायाने ‘शालेय कालखंड’ खूप महत्त्वाचा असतो.
प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे, सक्तीचे मोफत शिक्षण या शैक्षणिक उद्दिष्टानुसार शालेय कालखंड टाळता येत नाही आणि टाळणे योग्यही नाही. ‘रम्य ते बालपण’ याला छेद देणारी भिंतीच्या आतली शाळा आणि दप्तराचे ओझे तसेच फक्त मूल घरातील भिंतीमधून शाळेच्या भिंतीच्या आत प्रवेश करते; परंतु शालेय शिक्षणात निरनिराळे प्रयोग राबविणाऱ्या अनेक शाळा महाराष्ट्रात आहेत. असो.
लवकरच नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद राहिल्यावर विशेषत्वाने शाळेची गरज लक्षात आली. शाळेची इमारत, रंगविलेल्या भिंती, लिहिलेले फलक, काचपेटी, शाळेभोवतालचा परिसर, शाळेची घंटा, आपला वर्ग, बाक, पटांगण, इतर कक्ष या निर्जीव घटकांसोबतच शाळेत जाता-येताना, वर्गात शिकताना, बाहेर खेळताना, मधल्या सुट्टीत डबा खाताना, मार्गिकांमधून चालताना, मित्रांसोबत केलेली मजा-मस्ती, खोड्या, थोडा वाह्यातपणा, छेडछाड, गमती-जमती, तात्पुरते भांडण, असा बागडत एकमेकांबरोबर घालविलेला काळ, ही विद्यार्थ्यांची शालेय मैत्री संपूर्ण आयुष्यातील जमेची बाजू आहे. शिकतानाच शिक्षकांच्या, काकांच्या न विसरता येणाऱ्या आठवणी, असा हा शिकता शिकता मुलांना विकसित करणारा शालेय कालखंड. आज तेच बालदोस्त निवृत्तीनंतर एकत्र येऊन, मागे वळून आपल्या शाळेला मदतही करीत आहे.
प्रत्येक विषयाची तोंडओळख शालेय शिक्षणात व्हावी या उद्दिष्टात भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या मुख्य विषयांची प्राथमिक माहिती चांगल्या प्रकारे शालेय अभ्यासक्रमात समजते. प्रत्येक विषयाची भाषा वेगळी असून तिचे महत्त्वही स्वतंत्रपणे अधोरेखित करावे असेच आहे. फक्त पालकांनी लक्षात घ्यावे, आपल्या मुलाचे कमी-जास्त गती असलेले विषय कोणते? किती गुण मिळाले? यापेक्षा त्याला त्या विषयाची संकल्पना स्पष्ट झाली झाली का? हे पाहणे गरजेचे आहे. आता गती नसलेला विषय म्हणजे त्याचे आयुष्य नव्हे. विज्ञानात मिळणाऱ्या गुणांपेक्षा विज्ञानाचे खरे गुणधर्म, नियम, तत्त्व समजलेले विद्यार्थी थोडेच असतात. असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना विषय समजूनही लिहता येत नाही. प्रत्येक विषयाच्या बाबतीत पालकांनी आपल्या बालकाला समजून घेऊन त्याच्याशी, शिक्षकांशी संवाद साधून पूल जोडावा. शालेय जीवनात नापास झालेल्यांनी अरुण शेवत्यांचे ‘नापास मुलांचे प्रगती पुस्तक’ हे पुस्तक वाचावे.
मुख्य विषयासोबत शारीरिक शिक्षण, संगणक, चित्रकला याच्या जोडीला पर्यावरण, समाजसेवा, कार्यानुभव हे भिंतीबाहेरचे विषय असूनही भिंतींच्या आतच घेतले जातात. हे श्रेणी विषयच मुलांचे भविष्य घडवीत असतात. काही वर्षांपूर्वी कार्यानुभवच्या तासाला केलेल्या बिस्किटाचा दरवळ विवेक ताम्हाणे यांच्या मनात घर करून गेला. विवेक ताम्हाणे तीस वर्षांहून अधिक काळ आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रमुख शेफ म्हणून कार्यरत आहेत. बेकरी पदार्थ, केक्स, चॉकलेट यातील विशेष प्रावीण्यासाठी जगात नाव आहे. श्रेणी विषयाकडे सर्वत्र होत असलेले दुर्लक्ष, विचार करायला लावणारे आहे.
“लेंड अ हँड इंडिया”च्या सहकार्याने ३५० शाळांमध्ये कौशल्य विकास योजनांतर्गत शंभर गुणांचा नववी/दहावीसाठी कौशल्यावर आधारित एक विषय शिकविला जातो (खेळ, आरोग्य, सौंदर्य, ऑटोमोबाइल) निदान पालकांनी आपल्या मुलाचा कल पाहून बाहेरून पूरक शिक्षण द्यावे. नाहीतर रॅट रेसमध्ये बालक आपले बालपण हरवून जातील.
वर्गात तासिकेला शिकविले जाणारे तेवढेच शिक्षण हा विचारही बदला. शालेय अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट ‘सर्वांगीण विकास’. प्रत्येक विषयाच्या क्षेत्राशी संबंधित स्पर्धा घेतल्या जातात. मोजकेच विद्यार्थी भाग घेतात, तरीही तो माहोल बिया रुजविण्याचे काम करीत असतो. बालमनावर चांगले संस्कार व्हावेत, आपली संस्कृती, देशाभिमान, लोकोत्तर व्यक्तींचे कार्य कळावे म्हणून वर्षभराच्या सहशालेय कार्यक्रमात दिनविशेष, १५ ऑगस्ट – २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण, आपले सण, निसर्ग/विज्ञान मंडळातून क्षेत्र भेट, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, आखणी/नियोजन/ निवेदन समजावे म्हणून काही कार्यक्रमाची जबाबदारीसुद्धा विद्यार्थ्यांवर टाकली जाते. वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाच्या आनुषंगाने शाळेतील प्रत्येक दिवस शाळा मुलाला विचार पोहोचवत असते. होणाऱ्या कार्यक्रम/स्पर्धांमधून विद्यार्थी-शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थी यात नाते तयार होते. काही शिक्षक विद्यार्थ्यांचे आयडॉल बनतात. फक्त घरी आल्यावर पालकांनी आपल्या मुलाशी संवाद साधा. आज शाळेत काय झाले? शालेय प्रोजेक्ट, प्रकल्पात, सजावट नको, विकतचे नको, नेटचे चौर्य नको. एखादा पाठ्यांश, एखादा गुणधर्म, तत्त्व यांवर प्रत्यक्ष कृती हवी. विचारप्रक्रिया महत्त्वाची. हेच खरे शिक्षण.
फांदीवरच बसून राहिलेला न उडणारा ससाणा फांदी तोडताच उडायला लागला. पालकांनीही एखाद्या विचारलाच चिकटून बसायची मनोवृत्ती (मेंटल बॉक्स) तोडा. पालकांनी फक्त नावे ठेवणे, टीकाटिप्पणी करण्यापेक्षा काय काय मिळतंय, या भावनेने नजर फिरवा, शाळेत खूप काही मिळते. लहान मुलांच्या जडणघडणीत शालेय कालखंड महत्त्वाचा रोल ठरतो. शिक्षक, पालक दोघांच्या सहकार्याने बालकांचा शालेय कालखंड आनंददायी करूया. Growth is Happiness!