डॉ. स्वप्नजा मोहिते
जिंदगी… आपल्या वाट्याला येणारं रोजचं नाव पान! रोज नव्यानं सुरुवात करायची लेखाजोखा मांडायची! सकाळपासून रात्रीचा अंधार कवेत घेईपर्यंत, जीव तोडून धावायचं रोज नव्या स्वप्नांच्या पाठी… अपेक्षांचं ओझं आपलं आपणच लादून घ्यायचं पाठीवर आणि शोधत राहायचं, त्या पूर्ण करण्यासाठी नवेनवे मार्ग! काही अपेक्षा पूर्ण होतात… काही राहतात तशाच अपूर्ण, अतृप्त! दुसऱ्या दिवशी पुन्हा नवं पान! पण मागे उरलेल्या सावल्यांचं काय? अतृप्त, अपूर्ण स्वप्नांचं काय होतं तेव्हा? मागचं पान अपूर्णचं सोडून द्यायचं? आणि नवं पान मिळालंच नाही तर? जिंदगी त्या अर्धवट सोडून दिलेल्या पानावरच अडकून राहिली तर?
किताब कुछ अधुरीसी, मायूस सी छोड आये हैं,
ए जिंदगी, तेरे हिस्से की स्याही यूं ही छोड आये हैं,
हवा के झोके, पत्तो की सरसराहट,
पलकों पे ठहरेसे आँसू,
तेरे नाम छोड आये हैं…!
तिला पाहिलं की, या ओळी आपसूकच येतात माझ्या मनात! ती… उदास, कोऱ्या चेहऱ्याची… भकास, स्वप्न हरवलेल्या डोळ्यांची… मातीत रेघोट्या ओढत बसलेली! तिच्या आयुष्याचं पान अर्धवट सुटलेलं. जिंदगीशी कट्टी केलीय मी… मनात असेल, तर ती बोलायची. नाहीतर ओठांवर मौनाची चादर घट्ट पांघरून ती राहायची. आत्ममग्न… एकटी! तिच्या मनात आणि डोक्यात काहीतरी केमिकल लोच्या झालाय… आसपासचे म्हणायचे! एका रात्रीच्या अंधारानं गिळून टाकलं तिचं स्त्रीपण… कोणीतरी कुजबुजायचं! रनिंग अवे फ्रॉम शॅडोज… ती म्हणायची. रनिंग अवे फ्रॉम शॅडोज… श्राऊडिंग मी इन देअर एम्ब्रॅस… डिप अँड डार्क, विथ हॅन्ड्स फुल ऑफ थोर्न्स… आय एम रनिंग अवे फ्रॉम शॅडोज… सावल्यांपासून दूर पळतेय मी… ज्या टाकतात मला गुरफटून… त्यांच्या काळ्या काटेरी मिठीत… गच्च खोल काळोखात…सावल्यांपासून पळतेय मी…! कधी कधी तिला गुणगुणताना ऐकलंय मी!
त्या सावल्या तिच्या डोळ्यांत झाकोळून येतात. मातीतल्या रेघोट्या वाढत जातात. कुठल्याशा कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेत ती स्फुंदत राहते तेव्हा. तिचा हात हातात घेऊन, मी तिच्या जिंदगीच्या अपूर्ण पुस्तकातलं ते फाटकं पान वाचायचा प्रयत्न करत राहते. अर्धवट कोऱ्या पानावर तिनं लिहिलेल्या कविता असतात. स्वप्नांची चितारलेली चित्र असतात आणि पुढे केवळ काजळ माखले फराटे…!! तीच खूप प्रेम होतं एकावर… त्यानंही दाखवली खूप जरतारी स्वप्न तिला! आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसवलं… आभाळाला स्पर्श करायला शिकवलं.
आभाळाला स्पर्श करताना जमिनीवरचे पाय सुटले आणि एका हळव्या क्षणाला त्यानंच दिली तिची आहुती… स्वतःच्या स्वार्थासाठी तिला लांडग्यांच्या तावडीत देऊन तो निघून गेला… रात्रीचा काळोख अजूनच गडद होत गेला.
काळोखाचं वस्त्र तिच्या आक्रोशानं उसवलं… फाटलं चिंध्या चिंध्या होतं… पण तो आला नाहीच. ती मात्र मग तुटतच गेली आतून… मरत राहिली रोज, रात्र गडद होत जाताना… काळोखाची श्वापदं रोज घेत राहिली तिच्या अस्तित्वाचा घास! आपली जिंदगी ज्याच्याशी जोडली, तोच तिचा राहिला नाही आणि मग ती ही तिची राहिली नाहीच! मग भरकटत राहिली ही वाट फुटेल तिथे… जुन्या आठवणींची चादर पांघरून घेत!
मेरा कुछ सामान… तुम्हारे पास पडा हैं…
सावन के कुछ भिगे दिन रखे हैं…
और मेरे एक खत में लिपटी रात पडी हैं…
वो रात बुझा दो… मेरा वो सामान लौटा दो…!
तिच्या डोळ्यांत त्या रात्रीच्या जीवघेण्या खुणा उमटतात. शॅडोज दॅट कॅरी द वेट ऑफ माय ब्रोकन सोल… अँड आय किप रनिंग… रनिंग अवे फ्रॉम माय ओन शॅडोज!! तुला दिसतात का त्या सावल्या? ती मला विचारत राहते. माझ्या आयुष्याच्या पुस्तकात मग मी शोधत राहते माझ्याच सावल्या! प्रत्येक पानावर एकतरी खूण असतेच अशा सावलीची! आपण प्रत्येकजण पळत असतो अशा सावल्यांपासून… दूर… आयुष्याच्या पुस्तकात सावल्यांचा हिशोब मांडत राहतो… ती मला सांगत राहते तेव्हा ती खूप शहाणी वाटते. दूर कुठेतरी बघत, ती बोलत राहते. मी वेडी नाहीये गं… फक्त सावल्यांचा हिशोब जुळत नाहीये आणि हे पळणं संपत नाहीये! बोलता बोलता आपलीच सावली तिला दिसते आणि ती आकसून घेते स्वतःला खोलीच्या कोपऱ्यात. कधीतरी जिंदगी नावाची ती हट्टी मुलगी मला भेटेल… तेव्हा विचारीन तिला… माझंच पान कोरं ठेवून तू का गेलीस? माझ्या किती आठवणी तुझ्या स्वाधीन केल्या होत्या विश्वासानं! त्या विस्कटून टाकल्या तिनं आणि त्या भूलभूलैयात हरवून गेले गं मी!
कधी कधी किती छान बोलते ही… मी नवलानं तिच्याकडे पाहत बसते. ही शहाणी की वेडी? की स्वतःला शहाणी समजणारी मी… हे आजूबाजूचं जग वेडं? जिंदगीच्या पुस्तकात रोज नवं पान भरताना, मागच्या पानावरच्या सावल्या झाकून ठेवायचा आटोकाट प्रयत्न करणारे आपण… चेहऱ्यावर रोज नवा मुखवटा चढवणारे आपण… शहाणपणाची झूल पांघरून इतरांना वेडं ठरवणारे आपण… समोरच्याच्या चुकांवर टोच मारत राहणारे… एकमेकांच्या जिंदगीत उगाचच लुडबुड करणारे आपण… आणि त्या ओझ्याखाली कुणी कोलमडलं की, त्यालाच त्या ओझ्याचा क्रूस खांद्यावर पेलायला लावणारे आपणच! तरीही या जिंदगीची पहेली सुटत नाही… कुणाला रोज नवं पान, तर कोणाची मागच्या पानावरच उरलेली जुनीच कहाणी!! कुठे गगनाला भिडणारा स्वप्नांचा झोका, तर कुठे आसवांनी भिजलेला पापणीच्या काठ! तरीही जगणं संपत नाही! या जिंदगीची साथ संपत नाही. रोज नव्या गतीनं, नव्या आशेनं पान
उलटायचं आणि वाट पाहायची सावल्यांचा जागी प्रकाशाचे मणी गुंफायची!
जिंदगी, कैसी हैं पहेली हाये!
कभी ये हँसाये… कभी ये रुलाये!
कभी देखो मन नहीं जागे… पिछे पिछे सपनो के भागे…
इक दिन सपनों का राही… चला जाये सपनों के आगे कहाँ?
ती केव्हाच तिच्या स्वप्नांच्या पुढे कुठेतरी पोहोचली आहे… तिच्या सावल्या नसलेल्या दुनियेत, तिच्या जिंदगीची पहेली सुटेल आता कधीतरी! मी मात्र अजून सावल्यांचा गुंत्यातून सुटायची वाट पाहत बसले आहे!
यूँ तो जिंदगी को खाँबो में पिरोते रहे हम
ए जिंदगी तुझे दूर से ही देखा किए हम!
कभी तुम थे बेखबर, कभी हम रहे तनहा
जिंदगी तुझे किताबों में सजाते रहे हम!
आज उन्ही पन्नो में फुलों के निशाँ मिले हैं,
आँसूओं से भिगी रात मिली हैं, मेरी तकदीर में लिखी जिंदगी
तू मुझे आज अचानक मिली हैं…!!