Thursday, July 25, 2024
Homeरविवार विशेषमुंबई पोर्ट ट्रस्ट नाबाद ‘१५०’

मुंबई पोर्ट ट्रस्ट नाबाद ‘१५०’

मारुती विश्वासराव

भारतातील इंग्रज काळातील जुन्या बंदरांपैकी एक असलेले मुंबई बंदर आहे. या बंदराची स्थापना २६ जून १८७३ साली झाली असून, २६ जून २०२२ रोजी मुंबई बंदर १५०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या बंदराचा थोडक्यात इतिहास असा की, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सात बेटांचा समूह असलेले मुंबई बेट आहे. १६५२ पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत येथील प्रतिनिधींचा या बेटावर डोळा होता. पण हे बेट भाडे करारावर देण्याच्या त्यांच्या विनंतीना पोर्तुगीजांनी दाद दिली नाही. त्यानंतर नऊ वर्षांनी इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांच्या विवाहात मुंबई बेट इंग्लंडच्या राजाकडे सुपूर्द करण्यात आले. राजाने हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर दिले. वर्षाला १० पौंड किमतीचे सोने द्यावे, असे नाममात्र भाडे आकारले. अशा पद्धतीने १६६८ साली मुंबई बंदर आणि सात बेटे (द्वीपसमूह) ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविण्यात आल्यानंतर व्यापाराची भरभराट व्हावी, यासाठी काही पावले उचलण्यात आली. कस्टम हाऊस, गोदामे, सुक्या गोद्या, अशी बांधकामे झाली. मुंबई बंदर हे जगभरातून येणाऱ्या वस्तूंच्या व्यापाराचे केंद्रबिंदू होतेच. १७३० साली मुंबईत जहाज बांधणीचा व्यवसाय सुरू झाला आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली.

मुंबई बंदरामुळे मुंबईतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही प्राप्त झाला होता. जहाजातील मालाची चढउतार करण्यासाठी त्यावेळी टोळी पद्धत होती. रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार मुंबईत येऊ लागले. त्यामुळे मुंबई बंदर आणि मुंबई शहर, असा एक सशक्त आर्थिक दुवा तयार झाला.

मुंबई बंदराच्या भरभराटीमुळे कामगारांची संख्या वाढत गेली. जगभरातील गोदी कामगारांनी बंदराच्या आसपासच्या शहरात कामगार चळवळीची पाळेमुळे रोवली होती. मुंबई शहरात १८८९ साली कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड्स असोसिएशन ही पहिली कामगार संघटना स्थापन केली, तर मुंबई बंदरातील वर्कशॉपमधील कसबी कामगार सदानंद गडकर व इतर कामगारांनी ३ मे १९२o रोजी बी.पी.टी. एम्प्लॉइज युनियन (आताची मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियन) ही मुंबई बंदरातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. १९३८ साली ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनची स्थापना झाली. त्यानंतर इतर कामगार संघटनांची स्थापना झाली. जमनादास मेहता, ईश्वरभाई पटेल, अशोक मेहता, डॉ. शांती पटेल, कॉ. जी. एच. काळे, कॉ. पी. डिमेलो, भाई मनोहर कोतवाल, कॉ. एस. आर. कुलकर्णी या बुजुर्ग कामगार नेत्यांनी गोदी कामगारांचे नेतृत्व केले. सध्या ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, केरसी पारेख, किशोर कोतवाल इत्यादी कामगार नेते गोदी कामगारांचे नेतृत्व करीत आहेत. गोदी कामगारांच्या जबाबदार व दूरदृष्टी नेतृत्वामुळे गोदी कामगारांना चांगली पगारवाढ, पेन्शन व हॉस्पिटल सुविधा मिळते.

भारतातील प्रमुख बंदरापैकी मुंबई बंदर हे अनेक वर्षे प्रथम क्रमांकावर होते. आता चौथ्या क्रमांकावर आहे. प्रमुख बंदरांमध्ये पूर्वी ३ लाख गोदी कामगार होते, आज २२ हजार कामगार आहेत. मुंबई बंदरात पूर्वी ४० हजार कामगार होते, आज ४ हजार कामगार आहेत. सर्व बंदरातील पेन्शनरची संख्या १ लाख ३० हजार असून मुंबई बंदरात ३६ पेन्शनर्स आहेत. १९८४ पासून मुंबई पोर्टमध्ये कामगार भरती होत नाही. कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चालली आहे. बंदरांच्या खासगीकरणाला सर्वच कामगार संघटना विरोध करीत आहेत.

मुंबई बंदरातील कामगारांची संख्या कमी असली तरी २०२१-२२ या वर्षी ५९.८९ दशलक्ष टन मालाची चढउतार झाली. मुंबई बंदर १५० वर्षांकडे वाटचाल करीत असताना त्यास अनेक संकटांचा सामना करावा लागला. १९८९ साली मुंबई पोर्टकडून ५०० कोटी घेऊन १२०० कोटी रुपये खर्च करून जवळच जे. एन. पी. टी. पोर्ट उदयास आले. त्यामुळे या बंदराचा फटका मुंबई बंदराला बसला. कंटेनरची कामे या बंदरात गेली.

आतापर्यंत प्रमुख बंदरांचा कारभार ज्या मेजर पोर्ट ॲक्ट १९६३ नुसार चालत होता, आता ३ नोव्हेंबर २०२१ पासून मेजर पोर्ट अॅथॅारिटी ॲक्ट अमलात आला आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार डॉ. शांती पटेल, कॉ. एस. आर. कुलकर्णी यांनी ६० वर्षावरून अधिक काळ मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार विश्वस्त म्हणून काम केले, तर ॲड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज आणि केरसी पारेख यांनी आठ वर्षे मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार प्रतिनिधी म्हणून काम केले. आताच्या नवीन कायद्यानुार नोकरीत असलेले गोदी विभागातील शेड सुप्रिटेडेंट व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे आणि लेखा विभागातील कार्यालयीन अधिक्षिका व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार कल्पना देसाई यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून २४ मे २०२२ पासून नेमणूक झाली आहे. मुंबई बंदराकडे १८०० एकर जमीन आहे. या बंदरात आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल, डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल, रो-पॅक्स टर्मिनल, मरिना, शिवडी ते एलिफंटा दरम्यानचा रोप वे, कान्होजी आंगरे बेट पर्यटन स्थळ, कोचीन शिप यार्ड, पिरपाव येथील चौथे केमिकल टर्मिनल, जवाहर द्वीप येथील पाचवे ऑइल टर्मिनल, असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -