Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजरा विसावू या वळणावर...

जरा विसावू या वळणावर…

श्रीनिवास बेलसरे

‘तुझ्या वाचून करमेना’ हा गजानन सरपोतदार यांचा दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा आला १९८६ला! अशोक सराफ, अलका कुबल आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट तसा विनोदी या श्रेणीतलाच होता. मात्र त्यातले सुधीर मोघे यांनी लिहिलेले एक गाणे खूप वेगळ्या प्रकारात मोडणारे, श्रोत्याला चिंतनशील बनवणारे, सिनेमातील प्रसंगाच्या बाहेर जाऊन मोठा आशय मांडणारे झाले होते. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांनी त्याला दिलेली चाल किंचित जास्त वेगवान झाली असे वाटत असले तरी गाणे ऐकताना छानच वाटते. अनुराधा पौडवाल यांच्या काहीशा सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या वाटणाऱ्या गोड आवाजाने तर गाण्याला पूर्ण न्याय दिल्याचे जाणवते.

‘तुझ्यावाचून करमेना’ ही मुळात एक प्रेमकथा. सर्व सुरळीत सुरू असताना, नायक नायिकेचे व्यवस्थित लग्न झालेले असताना कथा एक वेगळेच वळण घेते आणि दोघात गैरसमज निर्माण होतात. थोड्याच दिवसात मतभेद विकोपाला जाऊन अगदी घटस्फोटाची वेळ येते. त्यावेळी एका घरगुती समारंभाच्या प्रसंगी येणारे हे गाणे म्हणजे सुधीर मोघे यांनी निर्माण केलेली सुंदर कलाकृतीच म्हणावी लागेल. आज जेव्हा एकंदर विवाहसंस्थाच धोक्यात आणली गेली आहे आणि घटस्फोट ही गोष्ट खूपच कॉमन होऊ लागली आहे, तेव्हा हे गाणे अनेक तरुण-तरुणींना खूप सकारात्मक संदेश देऊ शकते. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी एकदा शांत बसून विचार करणे किती आवश्यक आहे ते अधोरेखित करणारा हा विचार आहे. कोणत्याही नात्यात चढ-उतार येतात ते कधी कुणाच्या चुकीमुळे, तर कधी केवळ गैरसमजामुळे! आणि प्रेमाच्या संबंधात तर माणूस पझेसिव्ह असतोच. जितके प्रेम जास्त तितका संशय किंवा गैरसमज होण्याची शक्यताही जास्त. हे सगळे स्वाभाविक आहे, हे मान्य करून जे काही घडले ते क्षणभर विसरणे गरजेचे असते.

त्या क्षणाचा भावनिक आवेग टाळला, तर अनेकदा केवढे तरी नुकसान टळू शकते. मात्र असा हा गुंतागुंतीचा आशय, अगदी सोप्या शब्दात मांडणे हे किती अवघड काम असते ते लिहिणाऱ्यानाच माहीत! पण मोघेंसारखे सिद्धहस्त कवी ही किमया लीलया साधतात. अगदी साध्या शब्दयोजनेमुळे गाण्याचा आशय श्रोत्याच्या हृदयात थेट पोहोचतो. श्रोता आशयाशी समरस होतो.

गाण्यातील कविता, विचार आपल्याला कधी पटले हे त्याच्या लक्षातसुद्धा येत नाही. इतक्या हळुवारपणे कवीने ते मांडले आहेत.
अनेकदा प्रेमात अंतर पडते तेव्हा दोन्हीकडे सुरुवातीला प्रचंड राग, आवडत्या व्यक्तीबद्दलची नावड निर्माण झालेली असते. पण प्रेम खरे असेल तर रागाचा पहिला पूर ओसरल्यावर थोड्याच दिवसात दोघांचेही आत्मपरीक्षण सुरू झालेले असते. थोड्याफार प्रमाणात तडजोडीची तयारीही झालेली असते. मात्र पुढाकार दुसऱ्याने घ्यावा, शरणागती त्याने पत्करावी असे वाटत असते. नेमका हाच आग्रह दुसऱ्या बाजूचाही असल्यामुळे दोघातले अंतर तसेच राहते! काही दिवसांनी दोघांनाही वाटते, ‘मी तर तडजोडीचा विचार करत होते/होतो, पण त्याला त्याची गरज वाटतच नाही.’ मग हट्टीपणा दोघांच्या मनाचा ताबा घेतो आणि समझोत्याची, दिलजमाईची शक्यता धूसर होते.

खरे पाहिले, तर हीच तर वेळ असते स्वत:हून पुढाकार घेण्याची! थोडेसे झुकण्याची, काही सोडून देऊन खूप काही वाचवण्याची! ज्याच्या हे लक्षात येते, तो हरूनही जिंकतो आणि ज्याला हे समजत नाही तो सगळेच हरून बसतो. इतके सगळे विचार गीतकाराने किती कमी शब्दात बसवले आहेत ते पाहिले की, कौतुक वाटते.

‘भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर,
जरा विसावू या वळणावर….’

तसे पाहिले, तर मानवी आयुष्य किती गूढ असते! आपण कुठून आलो, कुठे जाणार, उद्या काय होणार, हे काहीही माणसाला माहीत नसते. तरीही सहवासातून ऋणानुबंध तयार होतात, नाती फुलतात, जीवनाच्या शुष्क वाळवंटात कुठेतरी ओलावा सापडतो. ओअॅसिस गवसतो. कुणाबरोबर तरी माणूस सुखदु:खाचे अनुभव घेत जगणे शिकतो. कधी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या भेटीसाठी आतुर होतो, तर कधी त्याच्या मनाला उदासी घेरून टाकते.

‘कसे कोठुनी येतो आपण,
कसे नकळता जातो गुंतून,
उगाच हसतो, उगाच रुसतो,
क्षणात आतुर, क्षणात कातर…’

जगताना सगळे सतत थोडेच अनुकूल असते? कधी सुख, तर कधी दु:ख असे चक्र अव्याहतपणे फिरतच असते. तरीही जर प्रेमळ जीवलगाची साथ असेल, तर सगळे गोड करू घेता येते. प्रेमाचे कवच रेशमासारखे नाजूक असले तरी सर्व संकटापासून माणसाचे रक्षण करू शकते.

‘कधी ऊन, तर कधी सावली,
कधी चांदणे, कधी काहिली.
गोड करूनिया घेतो सारे,
लावुनिया प्रीतीची झालर…’

सगळ्या अनुभवातून गेल्यावर हे लक्षात येते की, अरे, ज्याला आपण आयुष्य आयुष्य म्हणून खूप गंभीरतेने जगलो तो तर विश्वाच्या अमर्याद पसाऱ्यातला, युगानुयुगे सुरू असलेला नियतीचा एक खेळ होता! मग कशाला दु:ख करायचे? हा खेळ, जो परमेश्वराने आपल्यासाठी रचला आहे, तो आनंदाने खेळावा हेच उत्तम.

‘खेळ जुना हा युगायुगांचा,
रोज नव्याने खेळायाचा,
डाव रंगता मनासारखा,
कुठली हुरहुर, कसले काहूर…?’

किती रास्त, सकारात्मक, सुखद आणि दिलासा देणारा विचार!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -