Saturday, March 22, 2025
Homeमहत्वाची बातमीमायभाषेचा रुजवा

मायभाषेचा रुजवा

नव्या शब्दांच्या जडणघडणीची प्रेरणा मुलांच्या मनात निर्माण करणे आव्हानात्मक आहे. विज्ञानातील शोधांच्या जन्मकथा जाणून घेण्यात जसा रस दाखवला जातो, तसा शब्दांच्या जन्मकथा जाणून दाखवण्यात रस असतो का?

डॉ. वीणा सानेकर

आपली भाषा जन्मत: आपल्याला प्राप्त होते, असे म्हणता येणार नाही. कारण, ती कमवावी लागते. ती आसपास असते, पण तरी ती ज्याची त्याला शिकावी लागते. ती शिकण्याची पहिली जागा म्हणजे घर आणि घरातले कुटुंब. मायभाषेची गोडी अवीट हे मुलांच्या मनात रुजवण्याचे कर्तव्य पालकांचे. त्याकरिता पालकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आपल्याकडे ट्यूशन्स नि क्लासेसचे प्रस्थ भरपूर वाढले, त्यामुळे आईबाबांसोबत अभ्यास करणे कमी झाले. अभ्यासाचे ओझे होऊ नये, तर त्यातून आनंद मिळाला पाहिजे, हे बाजूला राहिले. शब्दांची गुंफण कशी करायची, सुभाषिते, सुविचार, कवितांच्या ओळी यांचा उपयोग कसा करायचा हे लहानपणापासून मुले सहज शिकू शकतात. पूर्वी अनेक ठिकाणी बालसंस्कार वर्ग भरवले जायचे. आता ते अभावाने दिसतात. त्यांची जागा आता अत्याधुनिक ‘वर्कशॉप्स’नी घेतली आहे. त्यांची फी देखील रग्गड असते. मला आठवतं, मी तेव्हा शाळकरी वयात होते. आमच्या इमारतीत एक आजी रहायच्या, त्या रविवारच्या दिवशी गच्चीवर आम्हा मुलांना एकत्र जमवायच्या आणि छान छान गाणी शिकवायच्या. आजीने लावलेल्या चाली आम्ही मुले सहज पाठ करायचो आणि तालासुरात म्हणायचो. ही गाणी आम्हाला कधी पुस्तकात सापडली नाहीत. आजी म्हणायच्या, “मला ही माझ्या आजीने शिकवली.” पुढे कळले, ही तर लोकगीते… परंपरेतून चालत आलेली लोकमानसात अजरामर झालेली. याच आजींनी आम्हा मुलांना भोंडल्याची गाणी शिकवली.

भाषा शिकण्याचे मोठे केंद्र म्हणजे समाज. त्यातून जिथे आपण राहतो तिथे जवळ असे भाषा शिकण्याचे स्त्रोत निर्माण झाले, तर त्याचा कितीतरी फायदा मुलांना होऊ शकतो.

आताशा अनेक घरांतून ऑनलाइन खरेदी होते किंवा मग खरेदीकरिता नवनवीन मॉल्स शोधले जातात. पण आईचा हात धरून घराजवळच्याच बाजारातून फेरी मारण्यासारखा आनंद नाही. हा फेरफटका मारतानाही मुलांना निरीक्षणातून भाषा समजून घेता येते. मासे विकणारी कोळीण, भाजीवाली, कांदे-बटाटे विकणारे गाडीवाले काका अशा प्रत्येकाच्या भाषेची विशिष्ट शैली असते. शब्दांची विविधता तर या सर्वांतून दिसतेच, पण शब्दांची फेकही वेगवेगळी असते. आईने किंवा बाबांनी जाणीवपूर्वक मुलांचे लक्ष कधीतरी याकडे वेधायला हवे. शब्दांची निवड करण्याची प्रत्येकाची शैली वेगळी असतेच. पण उच्चारणाची पद्धतही माणसांगणिक बदलते. अनुनासिक, कठोर, मृदू, मधुर, सपक, जळजळीत, खरमरीत, स्पष्ट, रोखठोक, गुळमुळीत अशा कितीतरी विविध छटा शब्दांना प्राप्त होतात. माणसांची भाषा, ती वापरण्याच्या लकबी, त्या लकबींची वैशिष्ट्ये यांच्या अभ्यासातून मुलांची भाषेविषयीची जाण वाढते. हवामान, प्रदेश, आहार यांचाही माणसांच्या लकबींवर परिणाम होतो का?, हादेखील भाषातज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. एखाद्या शब्दाचा जन्म कसा झाला असावा, त्या उगमाची काही गोष्ट सापडू शकते का?, एखाद्या शब्दाला समान अर्थाचे कोणकोणते शब्द असू शकतात, अशा वेगवेगळ्या अंगांनी मुलांमध्ये भाषेविषयीचे कुतुहल जागृत करता येऊ शकते.

अशा प्रकारच्या कुतुहलातून मुले भाषेच्या अधिक जवळ जातात. साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी करताना नवे शब्द सापडत जातात. केशवसुतांची ‘झपूर्झा’ नावाची कविता यादृष्टीने अभ्यासण्यासारखी आहे. झपूर्झा हा शब्द केशवसुतांना कसा सुचला? जा पोरी जा… हे मुलींच्या खेळातले गाणे. हे फेर धरताना गायचे गाणे आणि त्याची भिनत जाणारी लय, यातून केशवसुतांना ‘झपूर्झा’ हा शब्द सुचला. हा शब्द निर्मिती करतानाची तंद्री सूचित करतो. मनाची विशिष्ट तन्मयता सूचित करतो. नवे शब्द निर्माण होणे, ते एखाद्या भाषेत रुळणे आणि वापरात येणे हे तिच्या समृद्धीचे लक्षण आहे. नव्या शब्दांच्या जडणघडणीची प्रेरणा मुलांच्या मनात निर्माण करणे आव्हानात्मक आहे. विज्ञानातील शोधांच्या जन्मकथा जाणून घेण्यात जसा रस दाखवला जातो, तसा शब्दांच्या जन्मकथा जाणून दाखवण्यात रस असतो का?

पु. शि. रेगे यांची एक सुंदर कविता आमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात होती. तिचे नाव होते ‘पुष्कळा’. हा शब्द त्यांनी खूप काही देणाऱ्या स्त्रीला उद्देशून वापरला आहे. पुष्कळ देणारी अशी ती पुष्कळा! शब्दांची अशी निर्मिती करणे जितके नितांतसुंदर आहे, तितकीच त्यांच्या निर्मितीमागच्या कथा समजून घेणेही सुंदर आहे. मायभाषेच्या श्रीमंतीचा रुजवा मुलांच्या मनात रुजवण्याचे फार मोठे काम पालक करू शकतात. जिथे जिथे हे घडते, तिथे मायभाषेचे वैभव नांदत असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -