Thursday, October 3, 2024
Homeमहत्वाची बातमीएचआर क्वीन- सुप्रिया काबरा

एचआर क्वीन- सुप्रिया काबरा

अर्चना सोंडे

जिथे गाडी पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम भागात देखील मारवाडी आपल्याला दिसू शकतो. अशा आशयाची एक म्हण आहे. ही म्हण शंभर टक्के खरी आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला मारवाडी समाजातील उद्योजक दिसतोच. मात्र ते जिथे जिथे गेले तेथील संस्कृतीत ते रमले. आपलं स्वत्व जपत त्यांनी आपल्या सभोवतालच्या वातावरणास आत्मसात केले. ‘आगे दुकान, पिछे मकान’ असं काहीसं त्याचं असतं. ती मात्र शेतकरी पेशा स्वीकारलेल्या एका साधारण पण उच्चशिक्षित कुटुंबातील. नोकरी न करता व्यवसायच करायचा हे तिने मनाशी पक्कं केलं. त्या निर्धारातूनच लघू- मध्यम दर्जाच्या उद्योगांना उपलब्ध मनुष्यबळ कसं वापरायचं याची सल्ला देणारी कंपनी सुरू केली. अवघ्या काही वर्षांत नवतंत्रज्ञानासोबत तिने एचआर क्षेत्रात स्वत:चा अमीट ठसा उमटवला. ही उद्योजिका म्हणजे कॉस्मिक कन्सल्टंटच्या संचालिका सुप्रिया नवाल काबरा…!

नरेश नवाल हे मारवाडी समाजातील एक प्रतिष्ठित नाव. अभियांत्रिकीची पदवी घेऊनसुद्धा नरेश नवाल हे शेतीकडे वळले. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांना जळगावात ओळखले जाते. शेती व्यवसाय स्वीकारल्याने आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. त्यांच्या पत्नी संतोष नवाल यादेखील पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी मात्र गृहिणीची भूमिका पार पाडत घराला आकार दिला. या दाम्पत्यास दोन मुले. सुप्रिया आणि सुयोग. या दोन्ही भावंडावर योग्य संस्कार केले. शालेय शिक्षणानंतर सुप्रियाने जळगावच्या एम. जे. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर पुण्याच्या इंडसर्च इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च या महाविद्यालयातून मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट ही व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी मिळवली. ही पदवी आता एमबीए इन एचआर म्हणून ओळखली जाते. सकाळी ही पदवी घेत असताना संध्याकाळी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन एन्व्हायरमेन्ट मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यास सुरू होता. त्यानंतर एका फार्मा कंपनीमध्ये काही काळ नोकरीदेखील केली. नोकरी करत असतानाच एका प्रतिष्ठित संस्थेतून तिने डिप्लोमा इन ट्रेनिंग पूर्ण केले.

चार ते पाच वर्षे सुप्रियाने नोकरी केली. नोकरी करतानाच भविष्यात व्यवसाय करण्याचे सुप्रियाने निश्चित केले होते. तिने अर्धवेळ व्यवसाय केला होता. कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते. या सगळ्याचा फायदा तिला व्यवसायासाठी झाला. फार्मा कंपनीतून बाहेर पडल्यानंतर तिने कात्रज डेअरीच्या रिजनल मॅनेजर्ससाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. त्यानंतर सुप्रियाने २ ऑक्टोबर २०११ मध्ये स्वत:ची मनुष्यबळ सक्षम करणारी कॉस्मिक कन्सल्टंट ही कंपनी सुरू केली. पुणे येथे कंपनीची शाखा आहे. उदयपूर, जयपूर आणि बंगळूरु येथे कंपनीचे सहयोगी आहेत. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पद्धतीने कंपनी ५० हून अधिक लोकांना रोजगार देते.

एमएसएमई उद्योजकांना सर्वात भेडसावणारा प्रश्न म्हणजे कर्मचाऱ्यांचा. या कर्मचाऱ्यांना कसे टिकवून ठेवावे, त्यांना प्रशिक्षण कसे द्यावे, याची काहीच माहिती या उद्योजकांना नसते. या श्रेणीतील उद्योजकांचे संपूर्ण लक्ष हे नवीन ऑर्डर्स मिळवणे, त्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करणे आणि पूर्ण केलेल्या ऑर्डर्सचे पैसे मिळवणे या चक्रात हा उद्योजक अडकलेला असतो, त्यामुळे त्याला आपल्या कर्मचाऱ्यांना वेळच देता येत नाही. ही अडचण नेमकी कॉस्मिक कन्सल्टंट दूर करते. ती कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते. त्यांचा परफॉर्मन्स वाढावा यासाठी प्रोत्साहित करते. त्यांची कार्यशाळा घेते. सोबतच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात एमएसएमई कंपन्यांचा पाठीचा कणा म्हणून कॉस्मिक कन्सल्टंट कार्यरत असते. सोबत पे रोल आऊटसोर्सिंग सेवादेखील ही कंपनी पुरवते. यासाठी कंपनीने स्वत:चे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सगळ्या सेवा देण्यासाठी एक्स्पर्ट आणि अनुभवी लोकांची टीम कॉस्मिक कन्सल्टंटकडे आहे.

त्याचप्रमाणे कॉर्पोरेट्ससाठी चार भिंतीतील आणि भिंतीबाहेरील प्रशिक्षण देखील दिले जाते. निव्वळ पुस्तकी पांडित्य न पाजळता अनुभवाधारित आणि कस्टमाइज्ड असेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. कृतीवर आधारित कार्यशाळा असं काहीसं या प्रशिक्षणाचे स्वरूप असते. सुप्रिया काबरा या अनेक बिझनेस नेटवर्किंग ग्रुप्समध्ये कार्यरत आहेत. ‘लज्जा’ ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारिणी समितीत सुप्रिया काबरा आहेत. संस्थेतील सदस्यांना त्या मनुष्यबळ संवर्धनाविषयी मार्गदर्शन करतात. सोबतच नवी मुंबईतील के. एम. मुन्शी इन्स्टिट्युट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज या संस्थेत त्या कार्यरत आहेत. भारतामध्ये कौशल्यांक कमी आहे, असे एका संशोधनातून आढळून आले आहे. हा कौशल्यांक वाढविण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. या प्रशिक्षकांचा दर्जा उत्तम असावा, त्यांचे ज्ञान अद्ययावत असले पाहिजे, हे अधोरेखित करण्यासाठी कॉस्मिक कन्सल्टंट राष्ट्रीय स्तरावरील एचआर फोरम सोबत काम करत आहे. उच्च श्रेणीच्या मानांकनास साजेसे दर्जेदार प्रशिक्षक तयार व्हावेत आणि ते उद्योगक्षेत्राला उपलब्ध व्हावेत यासाठी ही संस्था अभ्यास करत आहे.

“एक उत्तम नेतृत्व तयार होण्यासाठी चिकाटी आणि संयम हे दोन गुण अंगी बाणवले पाहिजेत. व्यवसायात चढ-उतार येतात पण हताश न होता दररोज आपलं काम करत राहणं, करत असलेल्या कामाचं फळ नक्कीच मिळतं, पण तेवढा संयम ठेवणं गरजेचं असतं,” असा कानमंत्र सुप्रिया काबरा देतात.

सुप्रिया नवाल काबरा यांचा विवाह मयूर काबरा या उमद्या तरुणासोबत झाला. एका मोठ्या बँकेत वरिष्ठ पदावर ते कार्यरत आहेत. या दाम्पत्यास स्वर नावाचं गोंडस बाळ आहे. आपल्या उद्योजकीय प्रवासात आई-बाबा आणि पतीचा मोठा वाटा आहे, असे सुप्रिया काबरा प्रांजळपणे नमूद करतात. सोबत विशेष आभार त्यांचे मानतात की, ज्यांनी सुरुवातीला सुप्रिया यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व असल्याने कुत्सित अशी टिप्पणी केली. या अशा लोकांमुळे आपल्याला पुढे जाण्यास ऊर्जा मिळाली, असे सुप्रिया नमूद करतात. इंडियन सोसायटी ऑफ ट्रेनिंग अॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित समजला जाणारा ‘इनोव्हेटिव्ह एचआर प्रॅक्टिसेस अॅवॉर्ड’ २०१९ साली कॉस्मिक कन्सल्टंटला मिळाला.

एखादी महिला जेव्हा लेडी बॉस बनते, तेव्हा ती राज्यच काय, तर देशसुद्धा चालवते. तिला समाजाने टोमणे मारले, हेटाळले तरी ती यशस्वी होऊन दाखवतेच. सुप्रिया नवाल-काबरा खऱ्या अर्थाने कणखर एचआर क्वीन आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -