Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजगुजरातचे ‘सरदारधाम’ बनले सनदी अधिकाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र...

गुजरातचे ‘सरदारधाम’ बनले सनदी अधिकाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र…

अहमदाबादमध्ये २००० मुलींसाठी दुसरे सरदारधाम तयार होत आहे. त्यामध्ये फक्त मुली आणि मुलीच राहतील. सुरत राजकोट बडोदा आणि कच्छ येथेही सरदार भवन उभे राहत आहेत. सरदारधाम हे जागतिक आश्चर्य आहे, असेच म्हणावे लागेल.

प्रा. डाॅ. नरेशचंद्र काठोळे

गुजरातला माझे एक मित्र आहेत. रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे. ते मला नेहमी म्हणायचे, “काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो. केवल एक रुपये मे बच्चो को आयएएस का ट्रेनिंग दिया जाता है.” मला उत्सुकता होती. त्यामुळे मुंबईतील शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्याकडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थेट अहमदाबादला निघालो. अहमदाबादला उमिया माता संस्थान आहे. येथे देखील आयएएसचे प्रशिक्षण चालते. अजून तेथे मंदिर तयार व्हायचे आहे. पण आयएएस सेंटर मात्र तयार झाले, वसतिगृह तयार झाले. या आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी आयपीएस ऑफिसर नेमले गेले. मंदिर नंतर पण आयएएस सेंटर अगोदर. खरंच हा गुजरातचा पॅटर्न मला खूप आवडला. त्या प्रशिक्षण केंद्राच्या वस्तीगृहामध्ये मी थांबलो. सकाळी अखिल भारतीय कुर्मी महासभेचे अहमदाबादचे अध्यक्ष सतीश पटेल मला भेटायला आले. त्यांनी त्यांच्या सचिवांना सांगितले, “सरांना सरदारधाम दाखवून आण.” उमिया माता ट्रस्टमधला माझा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सरदारधाम पाहायला गेलो.

साधारणपणे धाम वगैरे म्हटल्यानंतर मंदिर तीर्थक्षेत्र असा भास होतो; परंतु येथे जेव्हा आमची कार सरदारधामजवळ थांबली. तेव्हा तिथे एक तेरा मजली उंच इमारत उभी असलेली दिसली. महाराष्ट्रातील मंत्रालयाला लाजवेल, अशी ती दोनशे कोटी रुपयांची इमारत दिमाखात उभी होती. इमारतीच्या दर्शनी भागांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा उभारला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पुतळ्या खालोखाल हा पुतळा आहे. आम्ही आतमध्ये गेलो. सचिवांनी आमचा तिथल्या पदाधिकाऱ्यांना बरोबर परिचय करून दिला. तिथल्या जनसंपर्क अधिकारी व पदाधिकारी यांनी आम्हाला पूर्ण सरदारधाम दाखविले. मित्रांनो कोणालाच विश्वास बसणार नाही. पण मी प्रत्यक्ष पाहून आलेलो आहे.

या सरदारधाममध्ये फक्त वार्षिक एका रुपयामध्ये मुलींना राहण्याची जेवणाची व १८ प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय केलेली आहे. साधारणपणे हजार मुली इथे आयएएस, बँकिंग, रेल्वे, स्टॉफ सिलेक्शन, गुजरात प्रदेश लोकसभा आयोग इत्यादी विविध परीक्षांची तयारी करतात. ज्या माणसाने हे भवन उभारले आहे, त्या माणसाचे नाव आहे गगजीभाई सुतरिया आणि हा माणूस फक्त चौथा वर्ग शिकलेला आहे. त्यांचा स्वतःचा मोठा व्यापार आहे. तो व्यापार त्यांची मुलं सांभाळतात आणि हा मोठ्या मनाचा माणूस दिवसभर सरदारधामातील देणगीसाठी पाटीदार समाजामध्ये फिरत राहतो. तुम्हाला नवल वाटेल. अहमदाबादला जसे सरदारधाम तयार झालेले आहे. त्यामध्ये सध्या २००० मुला-मुलींची व्यवस्था आहे. आता फक्त २००० मुलींसाठी दुसरे सरदारधाम बाजूलाच तयार होत आहे. त्यामध्ये फक्त मुली आणि मुलीच राहतील. त्याचबरोबर सुरत राजकोट बडोदा आणि कच्छ येथेही दोनशे-दोनशे कोटींचे सरदार भवन उभे राहत आहेत. मित्रांनो, खरोखरच कुठल्याही धामापेक्षा सरदारधाम हे जागतिक आश्चर्य आहे, असेच म्हणावे लागेल. माझ्या आयुष्यात तरी मी एवढे मोठे आयएएस सेंटर पाहिलेले नाही. या इमारती जरी दोनशे कोटीच्या असल्या तरी त्याचे व्यावसायिक मूल्य हे चारशे-पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे. कारण इथले सर्व व्यवहार पारदर्शक स्वरूपाचे आहेत. सर्वांनी आपली निःस्वार्थ सेवा दिलेली आहे. अगदी कंत्राटदारानेदेखील हिशोबी नफा घेतलेला आहे. अवाजवी एकही गोष्ट नाही. सरदारधामची देखभाल करण्यासाठी चार निवृत्त आयएएस अधिकारी आपली सेवा देत आहेत. सरदारधामची भव्यता तुम्हाला छताच्या उंचीवरून येते.

माझ्या माहितीप्रमाणे, आम्ही ज्या छताखाली उभे होतो, ते कमीत कमी १०० फूट तरी उंच असावे. इथे विद्यार्थ्यांना विविध १८ प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची प्रशिक्षणे चालतात. मुलींसाठी वार्षिक एक रुपया शुल्क असले, तरी विद्यार्थ्यांसाठी मात्र हे शुल्क गरीब विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये वार्षिक व श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी वार्षिक वीस हजार रुपये आकारण्यात येते. या शुल्कामध्ये राहणे, जेवणे व प्रशिक्षण हे सर्व आले. या सरदारधामची पाहणी केली असताना मला असे आढळले की, प्रत्येक कक्ष प्रत्येक सभागृह प्रत्येक कार्यालय हे पारदर्शक आहे. प्रत्येक कक्षाचा अर्धा खालचा भाग काचेने बनविलेला आहे. म्हणजे साधारण कमरेपर्यंत लाकडाचा भाग आणि त्यानंतर वरचा भाग पूर्ण काचेचा. मी अभ्यासिकेत गेलो. पण मला अभ्यासिकेत जाण्याची गरज भासली नाही. कारण काचेतून सर्व अभ्यास करणारे फक्त विद्यार्थी दिसत होते. मी जेव्हा गेलो, तेव्हा येथील उच्चपदस्थ अधिकारी माॅक इंटरव्ह्यू घेत होते. तो नजारादेखील आपल्याला बाहेरून पाहता येत होता. या ठिकाणी संगणकांची लाइन लागलेली आहे. इथे ग्रंथालय आहे. वाचन कक्ष आहे. ई-लायब्ररी आहे. जेवणाची व्यवस्था तर प्रचंड मोठी आहे.

मी सहज वस्तीगृहात डोकावल्यावर दोन-चार कक्ष पाहिले. कुठेही मला कचरा दिसला नाही. वस्तीगृहामध्ये मुलांना टेबल-खुर्ची, कॉट आणि अलमाऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी दोन-चार कक्षांत डोकावून पाहिले? पण मला कुठल्याही मुलाचे पुस्तक कुठल्याही मुलाचा कपडा बाहेर दिसला नाही. प्रत्येक मुलाचे कपडे, पुस्तके आतमध्ये राहतील, एवढी कपाटे त्या-त्या कक्षामध्ये त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्वयंपाक घरही अतिशय सुसज्ज. पोळी लाटण्यासाठी तिथे मशिन्स आहेत. रोज दोन हजार मुलांचा स्वयंपाक येथे केला जातो. रोज दोन हजार मुलांची ये-जा असून मला संपूर्ण इमारतीमध्ये कागदाचा, कचऱ्याचा एकही टुकडा दिसला नाही. संपूर्ण इमारतीमध्ये एकंदर ११ लिफ्ट आहेत. लिफ्टधारक इतका प्रेमळ आहे की, तुम्ही लिफ्टमध्ये येण्याच्या आधी लिफ्ट उघडून ठेवतो. तिथले जे पदाधिकारी, कर्मचारी अधिकारी यांना मी भेटलो. प्रत्येकाने माझे चांगले स्वागत केले. दोनशे कोटी रुपयांच्या सरदारधाममधील प्रत्येक माणूस विनयाने वागत होता. स्वतःहून माहिती देत होता. एक अधिकारी मला म्हणाले, “सर मंदिरापेक्षा या अशा वास्तूंची आज गरज आहे. आम्ही ती ओळखली आहे आणि म्हणूनच आम्ही ती सुरुवात केली आहे. आता बघा एक-दोन वर्षांत गुजरातमधील सुरत, बडोदा, राजकोट आणि कच्छ येथे दोनशे-दोनशे कोटींच्या चार-पाच इमारती उभ्या होतील. आमची गुजराती मुलं आयएएस, आयपीएस आणि अधिकारी होऊन पूर्ण भारतावर राज्य करतील.” केवढी मोठी दृष्टी आणि त्यासाठी केवढा मोठा त्याग हे लोक करीत आहेत आणि तेही निस्वार्थपणे.

खरंच आज एक रुपयामध्ये चांगले चॉकलेट पण मिळत नाही. पण या एक रुपया वार्षिक शुल्कामध्ये हे लोक गुजरातमधील मुलींना तयार करीत आहेत. ‘बेटी बचाव अभियान’ सगळ्या भारतात सुरू आहे. पण मला असे वाटते की, बेटी बचाव-बेटी पढाव, हे कार्य सरदारधाममध्ये प्रामाणिकपणे सुरू झालेले आहे. त्याला तोड नाही. पूर्ण इमारत इतकी स्वच्छ, इतकी देखणी की, मला एकदम पंचतारांकित हॉटेलची आठवण झाली. परवा मुंबईला मी चार दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलो होतो. पण त्या हॉटेलमध्ये सर्वत्र वस्तुनिष्ठता होती. पण सरदारधाम या पंचतारांकित आयएएस सेंटरमध्ये सर्वत्र आत्मीयता दिसत होती. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सर्वांमध्ये उत्साह दिसत होता. ज्यांनी हे भवन निर्माण केले ते गगजीभाई सुतरिया यांना भेटण्याची खूप इच्छा होती. पण ते देणगी गोळा करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. एक चौथा वर्ग शिकलेला माणूस माझा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे, आयएएस अधिकारी झाला पाहिजे. नोकरीला लागला पाहिजे. या भावनेने काम करीत आहे. सतत करीत राहणार आहेत आणि आपल्या बांधवांना सक्षम अधिकारी बनविणार आहेत. ते जरी कमी शिकलेले असले तरी त्याचे ध्येय मात्र व त्यांची दृष्टी मात्र भव्य अशी आहे. दिव्य अशी आहे. अशा या सरदारधामच्या निर्मात्याला मनापासून प्रणाम करावासा वाटतो.

या सरदारधाममधील एक नियम अजूनही खूप चांगला आहे. सरदारधाममध्ये जे सभागृह आहेत, खुले सभागृह आहे. बंदिस्त सभागृह आहे. सरदारधामने एक नियम करून ठेवलेला आहे. सर्वजण सभागृहामध्येच बसणार. फक्त ज्यांचे भाषण आहे तीच व्यक्ती स्टेजवर जाणार. तो एकटाच स्टेजवर असणार, ते पण भाषण देईपर्यंत. भाषण संपले की परत तो सभागारामध्ये जाऊन बसणार. हा नियम सर्वांनाच लागू आहे. अगदी गुजरातच्या राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील. ते देखील सरदारधाममध्ये आले तेव्हा त्यांनी या नियमांचे पालन केले. या सरदारधामचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे भारतातील सगळ्यात मोठे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे आणि सर्वात महत्त्वाचे की, आमच्या भारतीय मुलींना केवळ एक रुपयामध्ये राहणे, जेवणे आणि प्रशिक्षण देणे, ही व्यवस्था करणारे हे कदाचित जगातील पहिले केंद्र असावे. मित्रांनो! मी तुम्हाला विनंती करेन की, आपण खूप फिरतो. आपण अशा आधुनिक तीर्थक्षेत्राला भेट दिली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -