
डॉ. लीना राजवाडे
आजच्या लेखात जाणून घेऊ,
आहाराविषयी सामान्य नियम.
पाणी पिण्याविषयी नियम.
खाण्यात नेमके काय घ्यावे.
अन्न हे जठराग्निला इंधन पुरवते. त्यामुळे भूक लागल्यावर अन्न खाल्ले पाहिजे, तरच जठराग्नी आणि इतरही अन्नपचनाला मदत करणारे घटक हे सक्रिय राहू शकतात. खाल्लेल्या अन्नाचे शरीरातील रक्त, हाडे इत्यादी स्वरूपात योग्य परिवर्तन घडू शकते. पर्यायाने आयुष्याची अनुवृत्ती दीर्घकाळ निरोगी राहायला उपयोग निश्चित होऊ शकतो. म्हणूनच शास्त्रोक्त विधिपूर्वकच अन्न खायला हवे. मागील लेखात आपण पाहिले की, जेवणे ही कृती उदर भरणासाठी असली तरी ते यज्ञ कर्म आहे, हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे. यातील आणखीन महत्त्वाचा विचारात घ्यायचा भाग अग्निहोत्र हा जसा दोन वेळेला सकाळी, संध्याकाळी करतात तसेच दोन वेळेलाच प्रायः जेवावे.
- यामध्ये न भोक्तव्यं यामयुग्मं न लङ्घयेत्। याममध्ये रसोत्पत्तिः यामयुग्माद् बलक्षयः।
याम म्हणजे तीन तासांचा कालावधी होय. एकदा खाल्यानंतर किमान तीन तास काही परत खाऊ नये. या तीन तासांत पहिले खाल्लेले अन्न पूर्ण पचते. शरीर पोषक आहाररस तयार होतो; परंतु त्याचबरोबर याम युग्म म्हणजे सहा तास एवढा काळ उपाशीपोटी किंवा काही न खाता राहू नये. त्यामुळे बल क्षीण होते.
पहिले खाल्लेले अन्न पचले आहे, हे कसे ओळखायचे? यासाठीही वैद्यक शास्त्रात लक्षणे सांगितली आहेत. कोणतीही pathological investigation test न करता आपण स्वत:च स्वत:चे परीक्षण करू शकतो. ही लक्षणे पुढीलप्रमाणे स्वच्छ ढेकर येणे, उत्साह राहणे, योग्य पद्धतीने वेळेवर मलमूत्रविसर्जन होणे, शरीराला हलकेपणा जाणवणे, भूक लागल्याची तसेच तहान लागण्याची जाणीव होणे. यापैकी जेवढी लक्षणे जास्तीत-जास्त जाणवतील तेवढे आपले पचन चांगले होते आहे, असे समजावे. अन्न प्राशन हे स्वच्छ ठिकाणी करावे तसेच मलमूत्रविसर्जनही जिथे करतो ते ठिकाण स्वच्छ ठेवावे. भोजन करताना चांगल्या गोष्टी पाहाव्यात. आप्तेष्टांसोबत आनंद वाटेल अशा विषयांवर गप्पा करत जेवावे, तर ज्ञानेंद्रियांपर्यंत सूक्ष्म पचनातून चांगले पोषण व्हायला मदत होऊ शकते.
अन्न पदार्थात घन, द्रव किती प्रमाणात घ्यावेत -कुक्षैर्भागद्वयं भोज्यैः तृतीये वारि पूरयेत्। वायोः संचारणार्थाय चतुर्थमवशेषयेत्।
पोटाचे चार भाग मानले तर दोन भाग घन आहार, एक भाग द्रव आहार उरलेला एक भाग रिकामा ठेवावा. पाचकस्राव अन्नात मिसळताना अन्नाचे पचन नीट होण्यासाठी ही पोकळी आवश्यक आहे.·
- जेवताना पाणी कसे प्यावे, याचेही विधान शास्त्रात आहे. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ जेवणात आपण खातो. तेव्हा पहिल्या चवीचा पदार्थ खाल्ल्यावर जिभेला समाधान होते.
त्यानंतर दुसरा पदार्थ खाण्याआधी थोडे पाणी प्यावे. ज्यायोगे पहिल्या आणि नंतर आपण खाणार आहोत त्या दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेताना जीभ स्वच्छ राहायला मदत होईल. थोडे थोडे, मध्ये मध्ये पाणी प्यावे. जेवताना खूप पाणी पिऊ नये. कारण जास्त पाणी हे पाचकस्राव dilute करतात. त्यामुळे पचन नीट होत नाही. त्याचप्रमाणे अजिबात पाणी न पिणे असेही करू नये. प्रमाणात (एक भाग) एका वेळी थोडे थोडे पाणी प्यावे.
- तहान लागली असताना जेवणे आणि भूक लागली असताना पाणी पिणे असेही करू नये. वारंवार हे घडत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. अन्यथा तहान लागली असताना जेवल्यास (गुल्म) पोटात गोळा होणे किंवा गाठी होणे होऊ शकते. भूक लागली असताना पाणी प्यायल्यास (उदर) पोटात पाणी साठणे होते. कारण जठराग्नी बिघडलेला असतो. थोडक्यात भूक लागल्यावर जेवावे. तहान लागल्यावर पाणी प्यावे. शरीराकडून मिळणारे हे नैसर्गिक सिग्नल सजगतेनी पाहावे.
भारतात विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृती आहेत. आपला जन्म ज्या ठिकाणी झाला आहे तिथे बनणारे पदार्थ हे सात्म्य असतात. वारंवार वेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. आपल्या कामाचे स्वरूप कसे आहे. शारीरिक, मानसिक श्रम किती व कसे करतो त्यानुसारही पदार्थ खाणे हिताचे ठरते. एकूण काय तर आहारातील पोषकांश आपल्याला योग्य प्रमाणात जर हवे असतील, तर आहार घेताना विशेष नियमही पालन करणे तेवढेच आवश्यक आहे.
- खाण्यात नेमके काय घ्यावे -
तांबडी साळ तांदूळ, मूग, जुना गूळ, साजुक तूप, मधापासून बनलेली साखर, कोंबड्याचे मांस, काळ्या मनुका या गोष्टी जरूर खाण्यात ठेवाव्यात.
पुढील लेखात जाणून घेऊ, आहाराविषयी विशेष…...
आजची गुरुकिल्ली
मात्रावत् विधिवद् भुक्तं अन्नं सुखंपाकं याति।
प्रमाणात, नियम पाळून खाल्लेल्या अन्नाचे पचन सहज व योग्य होते.
[email protected]