Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीमोदीजींच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात - चंद्रकांत पाटील

मोदीजींच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात – चंद्रकांत पाटील

पुणे (हिं.स.) : नरेंद्र मोदीजींचे कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यांच्या कर्तृत्वावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेतील विजेत्यांचा रविवारी कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, नाट्य व सिनेअभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मानसी मागीकर, युवा अभिनेते आरोह वेलणकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की; त्यावर अगणित लघुपट निर्माण होऊ शकतात. कोविड आणि त्यानंतरच्या काळातील मोदीजींच्या अनेक निर्णयांमुळे देशाचा संपूर्ण जगात नावलौकिक वाढला. कोविडनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे संपूर्ण जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागला. त्यातून आपल्या शेजारील पाकिस्तानसह अनेक देशांचे अर्थचक्र कोलमडले. पण मोदीजींच्या कणखर नेतृत्वामुळे देशवासियांना इंधन टंचाई किंवा महागाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाहीत.

राजीव गांधीजींचा दाखला देऊन ते पुढे म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना गरीब कल्याणासाठी केंद्र सरकार एक रुपया खर्च करत होते. त्यापैकी दहा पैसेच लाभार्थ्याच्या हातात पोहोचायचे. राजीवजी देखील हे जाहीरपणे बोलून दाखवायचे. पण मोदीजी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सर्वात प्रथम जनधन योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी गरीब कुटुंबातील व्यक्तींचे बॅंकेत खाते सुरू केले, अन् या खात्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात केली. त्यामुळे लाभार्थ्यांना सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळू लागला. तेव्हा माननीय मोदीजींच्या असाधारण कर्तृत्वामध्ये अगणित लघुपट निर्माण होण्याची ताकद आहे. त्यामुळे पुढील वर्षी देखील अशाच प्रकारची स्पर्धा भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करावी, त्या माध्यमातून गरीब कल्याणाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळेल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर नरेंद्रजी मोदी हे देशाला सापडलेले अलैकीक व्यक्तिमत्त्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि मोदीजींनी देशासाठी झिजायला शिकवले. त्यामुळे अशा व्यक्ती सर्वांसाठी वंदनीय आहेत. आज संपूर्ण देशातील हिंदूंनी एकजूट होऊन देशासाठी अहोरात्र झिजणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -