डॉ. विजया वाड
“तू नं बाबू! लाजरा बुजरा निसंकोची आहेस.”
“हो. आहे. खूप संकोची आहे. मला भीती वाटते.”
“कशाची भीती?”
“तुम्ही यवढ्या मोठ्या साहेब.”
“नि तू सेवक.”
“खूप फरक आहे आपल्यात.”
“सगळ्या परिस्थितीनं घडवून आणलाय फरक.” ती म्हणाली.
“नशीब! दुसरं काय?”
“बाबू. आपण वेगळा विचार करू.”
“काय?”
“आता सांगत नाही.”
“मला धीर आहे मंजूजी.”
“मंजू. मंजू म्हण. ए मंजू!”
“मला आजन्म धीर होणार नाही.”
“मग बस रडत. मी डॅशिंग आहे.”
बाबू गप्प गप्प… अगदी मुका!
“बाबू, नशिबाने आय. पी. एस. अधिकारी बाबा लाभले मला नि तुला कामगार. जशी नशिबाची खेळी.”
“मला ठाऊक आहे ते.”
“मग बरं? का उगाच स्वत:ला दोष देतोस?”
“बरं, नाही देत. आता झालं?”
“बाबू, तू हुशार आहेस. बाहेर कसं वागावं हे तुला भलं समजतं.” मंजूला राहवलं नाही. जो तो नशिबानं खातो हेच सांगायचं होतं मंजूला.
“मंजू, मंजूजी, एक सांगू?”
“दोन सांग.”
“एकच सांगतो एका वेळी.”
“अरे मरा. मरा साले माझ्याच भवती साली कटकट.”
“ए म्हातारे sss दुसऱ्या बसखाली मर ना!…”
“माझ्या बसखाली नको, एक इनक्रिमेंट बंद होतं.” ड्रायव्हर खदखद खदखदला. मनातली मळमळ पैशांसाठी थबकरी. मरण येवढे स्वस्त आहे? मग आपली काकू, आपली आई? का जगतात ही माणसं? बारसं थाटात, मरण शोकांत! सारे रिवाज. रीतीप्रमाणे. जन्मले की हसायचं, मेले की रडायचं! जगासाठी! कधी कधीच आपल्यासाठी. आपली काकू… ही आई? का सारख्या डोकावतात मनात? फोन वाजला. काकू भाजली होती. बाबू सटपटला. इस्पितळात होती काकू. आई पांगळी होती. काकू जेवण करीत होती. सारी अडचण अडचण होणार होती. शेजारी म्हणून एक जमात असते. बाबूला जाणीव झाली.
“मंजू, माझी इमर्जन्सी आहे.”
“बाबू, काय झालं?”
“काकू माझी, भाजली. सिव्हिलला अॅडमिट आहे. शेजारी धावले गं मदतीला.”
“तू जा. उतर. नाही तर मी येते.”
“येतेस?”
बाबूचा स्वर अगतिक होता.
याचनेचा होता.
बाबूला ती हवी होती. पैसेपण खिशात नव्हते.
“पैसे आहेत का? नसतीलच!”… “नाहीत.” तो म्हणाला.
“माझ्या खिशात आहेत. चल.” मंजू म्हणाली.
बाबूला एकदम आश्वस्त वाटलं. “चल” तो एकारला.
माणसावर केव्हा कुठली वेळ चालून येईल? सांगता येत नाही.
दोघं पुढल्या स्टॉपला उतरले.
रिक्षा केली. सिव्हिलपर्यंत थेट! बाबूचा खिसा नव्हताच. मंजूस खिसा होता. भरलेला. गरजेपुरता. क्रेडिट कार्ड तिच्या खिशात होते. बाबूला आता खरोखर चिंता नव्हती. पैशांची! काकूची मात्र होती.
“काकू, तुजजवळ राहाते का बाबू?”
“हो. राहाते मुंबैत जागेची अडचण आहे ना! मंजू, काकू आमच्यात बिनभाड्याने राहाते.”
“मग तर जबाबदारीच आहे आपली.” इस्पितळ आले.
“चल. उतर बाबू. शेजारी हुशार आहेत. महानगरपालिकेच्या इस्पितळात सिव्हिलला दाखल केलं गेलं होतं. पैशांची अडचण नको म्हणून.
“वॉर्ड सी. खाट नं. सहासष्ट.” नर्सने यंत्रवत माहिती दिली. बाबूला ब्रह्मांड आठवलं. काकूनं सारं केलेलं. आई पांगळी! बापाविना बाबू वाढला होता. काकूनं वाढवला होता. गळ्यात पडला म्हणून नव्हे. गरिबीतही प्रेम, माया, विश्वास असतो.
राहावं लागलं याबद्दलची कृतज्ञताही असेल कदाचित.
“काकू कसं वाटतंय.”
“पैसे आणलेस का?”
“मजजवळ आहेत. काळजी नको.” मंजू म्हणाली.
बाबूला शांत शांत वाटलं.
“ही आहे. आता काळजी कसलीच नाही.”
“पेशंटपाशी किती माणसं?” नर्स तुसडेपणानं म्हणाली.
नर्स बाबूला पाहून म्हणाली, “बोलत बसू नका. हे सरकारी इस्पितळ आहे. देऊळ नाही.”
“चुकलो. माफी असावी.” बाबू दोन्ही हात जोडून. नर्सची बोलती बंद झाली.
“आटपा. पाच मिनिटांत बाहेर जा.” तिने रुबाबात म्हटले.
“भेटायची वेळ ४ ते ६ आहे.” कोण बोललं? प्रत्यक्ष सीनियर सिस्टर? बापरे बाप!
“आम्ही जाऊ सिस्टर बाई. आपण काम करा. काकूंना भेटून आम्ही निघून जाऊ.”
“बरं बरं” सिस्टर तेथून निघून गेली. मोठी सिस्टर प्रेमाने जवळ आली.” कसं वाटतं काकू?”
“बरं आहे.” भाजलेली काकू बोलली.
“जखमा खोल नाहीत ओनली फाइव्ह डेज मोर. मग त्यांना घरी न्या. सिव्हिलला गरजेपेक्षा एकही पेशंट ठेवीत नाहीत. खाटांची सोय हवी ना!”
“हो हो. तसंच करू.” बाबू म्हणाला.
आता बोलण्यासारखे काही उरले नव्हते. काकू पण पडून सडून कंटाळली होती. “दुखतं रे बाबू.”
“आता थोडे दिवस काकू. पुष्कळ सेवा करीन तुझी घरी!”
तो मायेने डोक्यावर हात फिरवीत म्हणाला.
“आजकाल पेशंटशी प्रेमाने बोलणारी इतर माणसं आटली आहेत.” नर्सने रिमार्क ठेवला. कोणी त्यावर भाष्य केलं नाही.
“काकू, ह्या मंजू साहेब.”
“बाबू, इस्पितळात काय साहेब साहेब लावलंय?”
“मंजू, त्यांना कोण आहात तुम्ही, याची ओळख दिली.”
“बाबू, तू पण ना!”
“मंजूजी हेड क्लार्क आहेत बरं काकू. आमच्या सेक्शनहेड.”
“नमस्ते.” काकू म्हणाली. ती दमली होती. डोळे मिटून घेतले.
“मंजूजी, काकूला झापड आली वाटतं.”
“पेशंटशी अनावश्यक बडबड नको.” दुसरी नर्स आली वाटतं!
मंजू नि बाबू म्हणाले, “चला, येतो.” निरोप घेतला आणि चटकन् निघाले बाहेर आले.
“बाबू, थँक्स. आता टीटीएमएम. तुझा तू… माझी मी.”
“मी येतो ना सोडायला.”
“वेडा आहेस का बाबू तू? मी का लहान मूल आहे?”
“मंजू, थँक्यू व्हेरी मच. सामान्य शिपाई मी तुमच्या कार्यालयातला. कोण एवढी आस्था दाखवतो?”
“आय लव्ह यू बाबू…” ती हसून म्हणाली.
“तरी पण थँक्स.”
“तू ना बाबू, फॉर्मल होऊ नकोस. मला परकं वाटतं मग.” ती गाल फुगवून म्हणाली रुसली.
“बरं… नो थँक्यू”
“आता कसं?”
“आय लव्ह यू मंजू.”
“आय लव्ह यू टू बाबू.”
“हे कसंतरी वाटतं?”
“काय कसंतरी? हेडक्लार्क नि शिपाई? यांचा स्नेह? ती का माणसं नाहीत?”
“आहेत ना. पण त्यांचा सामाजिक स्तर उपर नीचे आहे.”
“तुला बुद्धी आहे. पण तू वेगळ्या कामी वापरतोस.”
“मंजू, लोक काय म्हणतील?”
“लोक असंही नि तसंही म्हणतील. चार दिवस! नंतर जगाला वेळ नाही.”
“खरंच गं.”
“एकेरीच बोल.” मंजू आग्रहाने म्हणाली.
“दोन माणसं प्रेमाने बोलतात, तेव्हा एकेरीच बोलतात.”
“या ‘प्रेम’ शब्दाची भीती वाटते मला.”
“मला नाही वाटत.” बाबूचा हात हातात घेऊन प्रेमाने दाबत ती बोलली त्याला जाणवलं, तिचा हवाहवासा स्पर्श मऊशार होता.
“हे बघ बाबू, तुला मी आपला म्हटलाय तुझी पर्सनॅलिटी उत्तम आहे. तगडा खासा पुरुष आहेस. तू स्वत:ला कमी समजू नकोस.”
“पुरुष म्हणून कमी नाहीच आहे मी. खंबाटकी डेंजर घाट.”
“आवडलं.”
“खंबाटकी घाट?”
“होsss” “खूप खूप्पच.”
“एक मिठी मारावीशी वाटते.”
“रस्त्यात? आडोशाला तरी चल.”
“इथे सार्वजनिक मुतारी आहे. आडोशाला
बाग आहे.”
“मग बागेत जाऊया. घट्ट मिठी!”
त्यांनी तसे त्वरेने केले.
मिठी दृढ झाली. ‘प्रेमाची स्पर्शसही’!