
सीमा दाते
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आजच्या परिस्थितीत शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मविआचे सरकार हलले असताना आता शिवसेनेला मुंबई महापालिकेची देखील चिंता लागली आहे. मुंबईतील शिवसेनेचे पाच आमदार सध्या शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत याचा मोठा तोटा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही नगरसेवकांचा गट देखील फुटण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत मुंबईतील पाच आमदार आहेत. यात बोरिवली येथील आमदार प्रकाश सुर्वे, भायखळ्याच्या यामिनी जाधव, चांदीवली विधानसभेचे दिलीप लांडे, दादर - माहिम विधानसभेचे सदा सरवणकर, कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर हे शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
गेल्या चार वर्षांपासून स्थायी समितीपद भूषविलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी देखील शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. यशवंत जाधव यांचा देखील नगरसेवकांचा गट आहे. हा गट देखील फुटण्याची शक्यता आहे. जे आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यांचाही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा गट फुटण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. अवघ्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाचा फटका मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो.
‘संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील केली गेली नाही’ भायखळा येथील शिवसेनेचे आमदार आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी आपण शिंदे गटात सामील का झालो आहोत? किंवा हा निर्णय घेण्याची वेळ का आली? या बाबत व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
मधल्या काही महिन्यांत कुटुंबावर संकटे आली, मात्र या संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील केली गेली नाही. याबाबत मनात वाईट वाटलं, मी स्वत: मोठ्या आजाराने त्रस्त असतानाही पक्षाने विचारलं नाही, असे त्या म्हणाल्या. आम्ही अजून शिवसेनेतच असल्याचे यामिनी जाधव म्हणाल्या.