महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि एकेकाळी देशाला मार्गदर्शन करणाऱ्या या राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आता इतकी केविलवाणी झाली आहे की, आता बिहार, उत्तर प्रदेश या अन्य राज्यांकडे बोट दाखविणे म्हणजे विनोदच होईल. कारण एकेकाळी उत्तरेकडील या राज्यांमध्ये अशी राजकीय उलथापालथ घडणे ही विशेष बाब नसे. राज्यात जेव्हा तीन भिन्न विचारधारांचे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र आले, तेव्हाच कधी ना कधी यांचे सरकार गटांगळ्या खाणार, हे निश्चित झाले होते. अनेकदा अनेक नेत्यांनी तशी शक्यताही जाहीरपणे वर्तविली होती आणि त्याचा प्रत्यय आता सर्वांनाच येत आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची जातकुळी सारखीच आहे. पण तिसरा पक्ष शिवसेना यांची विचारसरणी ही या दोघांपेक्षा खूपच भिन्न आणि धर्म व भाषिक मुद्द्याला प्रमाण मानणारी असल्याने हे तीन पायांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, याची खूणगाठ बांधली गेली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत या महाविकास आघाडीबाबत अनेक दिवस खदखद सुरू होती. त्याचा आता भीषण स्फोट झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड आणि दिवसेंदिवस त्याची वाढत जाणारी व्याप्ती पाहता शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाचाच जणू प्रश्न निर्माण झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
एवढ्या मोठ्या बंडाची पुसटशीही कल्पना पक्षप्रमुखांना किंवा त्यांच्या बगलबच्चांना येऊ नये, ही एका सत्ताधारी आणि सामान्यांशी नाळ जोडलेल्या पक्षाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. आता एकनाथ शिंदे यांचे बंडच इतके मोठे आहे की, पक्ष वाचविण्याची केविलवाणी धडपड पक्षप्रमुख करीत आहेत. त्यासाठी त्यांना भावनिक साद, आर्जव, विनंत्या आणि मधूनच पुसटश्या धमक्या असा पवित्रा घ्यावा लागत आहे. त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शुक्रवारी आपली भूमिका मांडताना पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीच्या वेळी ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. हा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि भाजपसोबत जाण्यासाठी दबाव असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मन मोकळे करण्याच्या नावाखाली त्यांनी आपल्या आजाराचे कारणही पुढे केले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले ‘वर्षा’ सोडण्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘‘वर्षातून बाहेर पडलो म्हणजे मोह सोडला. पण जिद्द मात्र सोडलेली नाही’’, असे ते म्हणाले. याचा अर्थ मुख्यमंत्री पदावर अजूनही कायम राहण्याची जिद्द त्यांनी सोडलेली नाही, असेच दिसते. ‘मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले’, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना टोला लगावला. पण ही बंडाची आग इतकी मोठी का झाली? ती अशी घातक बनेल, याचे भान का आले नाही? की सत्तेच्या धुंदीत आणि मस्तीत साऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्य आमदारांना निवासस्थानी बोलावून याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी काही झाले तरी सोडून जाणार नाही, असे सांगितले होते. पण त्यावेळी उपस्थित असणारे मंत्री दादा भुसे, संजय राठोड हे शब्द देऊनही निघून गेले. हे असे का झाले? याचा विचार करण्यासाठी आता वेळही उरलेला नाही. ‘‘आपण भाजपसोबत जावे, यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव येत आहे’’, असेही त्यांनी सांगितले. या आमदारांचे त्यात काय चुकले? जी गोष्ट आधीच करायला हवी होती व ती जर केली असती, तर आता जी नामुष्की आली आहे ती ओढवली नसती, हे खरे.
अनेकदा मनधरणी करूनही माघार घ्यायला तयार नसलेल्या बंडखोर आमदारांवर ठाकरे यांनी अक्षरश: आगपाखड केली. ‘‘आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेय’’, असे म्हणणाऱ्या शिवसेना आमदारांचाही ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. ‘‘आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे. हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्वत:चा मुलगा खासदार, हे कसे चालते?’’, असा सवाल उपस्थित करत त्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. ‘‘तुम्हाला तुमच्या मुलाला मोठे करावेसे वाटते. मग मला वाटणार नाही का?’’, असा सवालही विचारला.
यावेळी ठाकरे यांची बंडखोरांची मनधरणी करण्याची केविलवाणी धडपड दिसून आली, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की, त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघातही त्याची प्रतिक्रिया उमटेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे, हे देशाला कळेल, असे पवारांनी म्हटले होते. बंडखोर आमदारांनी इथे येऊन बोलले पाहिजे, आसाममध्ये राहून नाही, असेही त्यांनी सुनावले. अशा प्रकारे राज्यातील मविआचे सरकार आणि शकले होत असलेली शिवसेना वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न सर्वतोपरी सुरू आहेत आणि ठाकरे सरकार शेवटची घटिका मोजत आहे.