
मुंबई (वार्ताहर) : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यात मोठ्या घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या खात्यांच्या फाइली क्लिअर करण्यासाठी सध्या मंत्रालयात मंत्री आणि अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे.
'सत्तांतर होणार' यामुळे फाइलींवर सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे आदी कामे गेल्या दोन दिवसांत वाढली आहेत. कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाइल्स पडून असल्याचे चित्र सध्या मंत्रालयात दिसत आहे. महत्त्वाच्या विषयांवरील मंत्रालयातील फाइल्स, महत्त्वाचे अर्ज याचे काम करून घेण्यासाठी अनेक जणांच्या मुंबईच्या वाऱ्या वाढल्या आहेत.
अनेक महिन्यांपासून मंत्रालयात धूळ खात पडलेल्या फाइल कपाटातून शोधण्यासाठी अधिकारी आणि संबधीतांची धावपळ उडत आहे. यामुळे फाइलच्या संबधीत विभागातील कर्मचाऱ्यांचे नेहमीपेक्षा काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मंत्रालयातील अधिकांऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.