मुंबई (हिं.स.) : गुजरातमधील २००२ च्या दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी गुजरात एटीएसच्या दोन पथकांनी तिस्ता सेटलवाडला मुंबईहून ताब्यात घेतले आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून एटीएसचे पथक सेटलवाडला चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झाकिया जाफरीची याचिका फेटाळून लावताना तिस्ता सेटलवाडच्या एनजीओची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एटीएसने ही कारवाई केली आहे. त्याचवेळी, शनिवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनीही तीस्ता सेटलवाडच्यासह अनेक राजकारण्यांवर नरेंद्र मोदींची बदनामी केल्याचा आरोप केला. गुजरात एटीएसने तीस्ता सेटलवाडच्या विरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये आयपीसीच्या कलम ४६८ आणि ४७१ अंतर्गत खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे.
एटीएस अधिकारी जस्मिन रोजिया यांनी सांगितले की, तीस्ता सेटलवाडला सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहमदाबाद शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येईल. एटीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सेटलवाडला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, फक्त ताब्यात घेण्यात आले आहे.
गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ६२ राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात झाकिया जाफरीनी याचिका दाखल केली होती. जी कायद्याचा गैरवापर करणे योग्य नाही असे म्हणत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या तपासाचे कौतुक करत कायद्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी घणाघाती टीका केली. सुप्रीम कोर्टाने तीस्ता सेटलवाडचेही नाव घेत विरोधात आणखी चौकशीची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर सेटलवाडला शनिवारी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.