
अतुल जाधव
ठाणे : शिवसेनेला ठाण्याने पहिल्यांदा सत्ता दिली. तेच ठाणे आता शिवसेनेविरुद्ध बंड करून उठले आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्यामागे ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी, आमदार, शिवसैनिक, माजी नगरसेवक यांची मोठी फळी तैनात असून या सर्वांचाच एकनाथ शिंदे यांना सक्रीय पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आता ‘एकनाथांचे ठाणे’ झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती? अशी काहीशी मनस्थिती झाली होती. मात्र आता एक एक करून ठाण्यातील शिवसैनिक एकत्र येत असून त्यांनी शिंदे यांचाच झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे बॅनर, पोस्टर शहरभर लागण्यास सुरवात झाली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना अशा आशयाचे बॅनर व्हायरल केल्याने आता ठाण्याची साथ शिंदेंनाच हेच आता यातून दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात शिंदे यांच्या बाजूने आमदारांची फौज वाढत असल्याने आता ठाण्यातील शिवसैनिकांनी देखील शिंदे यांनाच साथ देण्याचा निर्धार केला आहे. मागील दोन दिवस ठाण्यातील शिवसैनिक देखील एक-एक करून एकमेकांचा कानोसा घेत होते. काहींच्या मनात शिंदे की ठाकरे? अशी द्विधा मन:स्थिती देखील निर्माण झाली होती; परंतु अशांची मने वळविण्याचे काम शिंदे समर्थकांकडून आता यशस्वीपणे केले गेल्याचेच चित्र गुरुवारी ठाण्यात दिसत होते. काहींनी या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांचीदेखील भेट घेतली आणि शिंदे यांनाच पाठींबा असल्याचे जाहीरपणे सांगितले, तर काही शिंदे समर्थकांनी अनेकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मन वळविण्याचे काम केल्याचेही बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील आता प्रत्येक भागात शिंदे समर्थकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. ‘साहेब आम्ही तुमच्या सोबतच, आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना’ अशा आशायाचे फलक शहरभर लावले जात आहेत.
त्या फलकांवर शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे फोटो दिसत आहेत. मात्र कुठेही उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून आला नाही. मविआबरोबरच शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी उघडपणे शिंदे यांना समर्थन जाहीर केले. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे चित्न आहे.
दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले असताना त्यावर काही शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तुम्ही शिवसेना सोडाल. पण शिवसेना तुम्हाला सोडणार नाही, अशा काही प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, गुरुवारी शिंदे यांच्या समथनार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर समर्थक शक्तिप्रदर्शन करणार होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काही शिवसैनिकांपर्यंत याची माहिती न पोहोचल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.