Saturday, July 13, 2024
Homeदेशमायावतींचा मुर्मूं यांना पाठिंबा जाहीर

मायावतींचा मुर्मूं यांना पाठिंबा जाहीर

लखनऊ (हिं.स.) : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी लखनऊ येथे बहुजन समाज पक्ष मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

मुर्मू यांना दिलेल्या पाठिंब्याचे कारण स्पष्ट करताना मायावती म्हणाल्या की, आम्ही हा निर्णय भाजप, एनडीए किंवा विरोधकांचा विचार करून घेतलेला नाही. आमचा पक्ष, विचारधारा आणि चळवळ डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे बसपा हा दलित चळवळीतून जन्माला आलेला पक्ष आहे. पक्षाची मूळ व्होट बँकही दलित आहे.

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. अशा स्थितीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा, या संभ्रमात बसपाही अडकला होता. अखेर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मायावती यांनी जाहीर केला. यासोबतच ओडिशाच्या बिजू जनता दलाने आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सनेही पाठिंबा जाहीर केला आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. बिहारच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एलजेपी पक्षानेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होत आहे. पुढील महिन्यात देशाला नवीन राष्ट्रपती मिळेल. १५ जून रोजी नव्या राष्ट्रपतींच्या निवडची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ जून आहे. जर निवडणुकीची वेळ आलीच तर १८ जुलै रोजी निवडणूक होईल आणि २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -