मुंबई : राज्यात सुरू असणाऱ्या सत्तांतराच्या नाट्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची एन्ट्री होणार आहे. कोरोना झाल्याने कोश्यारी यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता ते सक्रीय होत आहेत. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रीय नेते सक्रीय झाले आहेत, त्यानुसार महाराष्ट्रात लवकरच सत्तांतराची नांदी पाहायला मिळू शकते. कायदेशीर लढाया आणि घटनात्मक पेच मार्गी लावण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विशेष भूमिका निभावणार आहेत.
सध्या शिंदे यांनी माघार घेण्यास नकार दर्शवल्यामुळे शिवसेना कोणाची हा पेच अद्याप कायम आहे. शिवसेनेने १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिल्याने संपूर्ण मंत्रिमंडळालाच घटनात्मक पेचाला सामोरे जावे लागू शकते.
विधानपरिषदेच्या निकालानंतर ४१ आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने राज्यातील मविआ सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरात दोनदा दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत चर्चा केली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाने त्यांच्या गटाचे नाव निश्चित केले असून, आता हा सर्व वाद कायद्याच्या आणि घटनेच्या पेचात अडकणार आहे. त्यात राज्यातील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनीदेखील बैठकांमागे बैठका घेण्याचे सत्र चालू केले असून, शिंदे गटाकडून संध्याकाळपर्यंत मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.