Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसर्किटलेले राजे

सर्किटलेले राजे

डॉ. मिलिंद घारपुरे

आज एक मस्त गोष्ट सांगितली कुणीतरी!! एक आटपाट नगर. नगराचा राजा कर्तुत्ववान हुशार पण सर्किटलेला. त्याच भलंमोठं मंत्रिमंडळ आणि एक हुशार प्रधान.

एकदा राजाने मंत्रिमंडळाला आज्ञा सोडली मला उडणारा घोडा हवा आहे, शोधा. नाही मिळाला, तर वाट्टेल ते करून बनवा… झालं!! समस्त मंत्रिमंडळ त्यावर डोक्याला हात लावून बसलेलं. बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट डावलणं त्रिकाल अशक्य!!!

प्रधान विचार करतो… राजाकडे जातो म्हणतो… “अप्रतिम छान कल्पना. उडता घोडा बनेल की नक्की. बोललोय मी काही लोकांशी. अवघड मोठं काम पण अगदीच अशक्य नाही. प्रयत्न करूया आपण… पण कमीत कमी दोन वर्षे तरी नक्कीच लागतील…”

राजा विचार करतो, होकार देतो, शांत होतो. आपल्या कामाला लागतो. मंत्री प्रधानाला घेरतात. आरडाओरडा, राजाचा चमचा, चाटू, शेपूट हलव्या, बिन बुडाचा लोटा… वगैरे वगैरे… अगदी तोंडसुख… जाब विचारतात. काय होईल दोन वर्षांनी?

प्रधान शांत… “आता असं बघा, एक तर तो राजा, सम्राट. तुमच्याकडे उडता घोडा नाही आणि राजा काही झालं तरी हट्ट सोडणार नाही… दोन वर्षानंतरच कोणी पाहिलय. कदाचित राजा दोन वर्षांनी विसरून जाईल, कदाचित मी नसेन, कदाचित राजा नसेल, कदाचित तुम्ही नसाल. कदाचित हे राज्यच नसेल, सगळे असतील, तर केलेले प्रयत्न दाखवता येतील आणि महत्त्वाचं म्हणजे काय सांगावं, कदाचित उडणारा घोडा तुम्हाला मिळूनसुद्धा जाईल. आता उगाच नाही नाहीची नकारघंटा वाजवून कशाला राजकोपाला सामोरं जायचं?

आपल्या रोजच्या आयुष्यात असे अनेक सर्किटलेले राजे असतात. बुद्धिमान, ज्येष्ठ, वृद्ध, ज्ञानी अगदी आप्त म्हणावे असे… आपलाही बॉस त्यातलाच बऱ्याच वेळा… हे हुशार लोक मंद, मूर्ख वगैरे अजिबातच नसतात. पण कधी कधी आपल्या ‘सो कॉल्ड युनिक कम शेखचिल्ली छाप’ विचारांनी कधी समोरच्याची विकेट काढतील आणि कामाला लावतील याचा भरोसा नाही. जमायला हवं, जमिनीवर राहून अशा उडत्या घोड्यांचे पंख मोजता यायला…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -