मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेत्यांच्या सुरक्षेस असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. चारही मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत वॉकीटॉकीवर माहिती दिली होती. तसेच एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने जात असल्याची पूर्ण माहिती ‘कंट्रोल रूम’ला देण्यात आल्याचे समोर आले आहे. शिंदे आपल्यासोबत पाच ते सहा आमदारांना घेऊन गुजरातला जात असल्याची माहिती गृहमंत्र्यांना होती, असे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
या घडामोडीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचा दोष आढळून येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बंडाची तयारी करत असताना याची माहिती इंटेलिजन्सला पोहोचली नाही, याची शक्यता कमी आहे. सेनेत फोडाफोडी होणार. आमदार सूरतला जाणार आणि महाविकास आघाडी सरकारची कोंडी होणार, यासंबंधी संभाषणं झाली असणार आणि त्याची कानोकान माहिती कोणत्याही पोलीस यंत्रणेला लागली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, रातोरात एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री आणि आमदारांनी सरकारी सुरक्षा सोडली. महाराष्ट्राच्या सीमेवरच सर्वांनी सुरक्षा रक्षकांना माघारी पाठवले. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकारी काय करत होते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे गृहखात्याला याची माहिती होती, असे समोर आले आहे. आता संशयाची सुई वळसे पाटील यांच्याकडे गेल्याचे चित्र आहे.
राजकीय मंडळी महाराष्ट्र सोडून कुठेतरी जात होती. एकाच वेळी एवढे मोठे बंड घडत होते. याची कुणकुण सरकारी यंत्रणांना लागली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.