नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत १७ हजार ३३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. ही मागील १०० दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५ लाख २४ हजार ९५४ वर पोहोचली आहे.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा ८८ हजारांच्या पुढे गेला आहे. भारतात सध्या ८८ हजार २८४ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर ४.३२ टक्के आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.५९ टक्के इतके आहे. तर महाराष्ट्रात ११ फेब्रुवारीनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्रात ५ हजार २१८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे २४७९ रुग्णांची भर पडली आहे. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के झाले आहे.