मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे सदस्यांना अपात्र ठरवण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे पत्र शुक्रवारी दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठवले आहे.
महेश बालदी आणि विनोद अग्रवाल अशी या दोन आमदारांची नावे असून ते भारतीय जनता पार्टीच्या गोटातील असल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेने काल एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी झिरवाळ यांच्याकडे केली. त्यापाठोपाठ आज आणखी पाच आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर आता दोन अपक्षांनी हे पत्र लिहिले असून त्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संदर्भ दिला आहे. एखाद्या विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणला गेला असेल तर त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविरोधात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे या पत्रात नमूद केले आहे. असा कोणताही निर्णय घेण्याआधी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना या प्रस्तावाला सामोरे जावे लागते आणि त्यानंतरच त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असतो.
विधानसभा नियम १६९अन्वये उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला असून त्यामुळे त्यांना आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेता येणार नाही असे या पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचा गट जर अपात्र ठरला तर राज्यातले सत्तांतर होणार नाही. त्यामुळे आपल्यावर अपात्रतेची कारवाई होणार याची माहिती असल्यानेच एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. आता ही गोष्ट न्यायालयात जाण्याची शक्यता असून त्यावर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिलीप लांडेही शिंदे यांच्या गोटात
दरम्यान, आज शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडेही एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत. सूरतमार्गे ते गुवाहटीला दाखल झाले. त्यामुळे शिंदे यांच्या गटाला आणखी मजबुती आली आहे. कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागरही तेथे पोहोचले आहेत.