पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण ६६ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा २८ किलोमीटरचा मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.