Wednesday, July 24, 2024
Homeमनोरंजन'तमाशा लाईव्ह' मधील 'वाघ आला' समोर

‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’ समोर

मुंबई : सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. ”वाघ आला”चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.

गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” तर संगीतकार अमितराज म्हणतात, “आम्ही नेहमीच काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक पात्राला साजेल, असे संगीत आवश्यक असल्याने आम्ही खूप विचार करून संगीत दिले आहे. प्रेक्षकांना आमची कलाकृती नक्कीच आवडेल.”

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “नेहमीच काही तरी हटके करणारे दिग्दर्शक संजय जाधव यांनी या चित्रपटात वेगळं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतप्रेमींसाठी ‘तमाशा लाईव्ह’ म्हणजे एक पर्वणी आहे. यातील प्रत्येक गाण्यात काहीतरी प्रयोग करण्यात आला आहे. पहिल्या रोमॅंटिक गाण्याला रसिकांनी पसंती दर्शवल्यानंतर आता हे दुसरे गाणे आपल्या भेटीला आले आहे. आता इतर गाणीही लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येतील. नक्कीच प्रेक्षकांना ही उत्साहाने भरलेली गाणी आवडतील, अशी आशा व्यक्त करतो.”

प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित ”तमाशा लाईव्ह”ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -