Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीमी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार

उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

मुंबई : मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण मला समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. एकाही आमदाराने देखील माझ्या विरोधात मतदान केले तरी ती माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही गायब झालेल्या आमदारांपैकी कोणीही मला समोर येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे. मला दु:ख झाले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं…. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं…. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी आज वर्षा येथून मातोश्रीवर जात आहे. मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो. राजीनामा मीच दिला असता पण कोरोना झाल्यामुळे मी जाऊ शकत नाही. तेव्हा राजीनामा लिहून ठेवला आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी तो राज्यपालांकडे पोहचवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या राजकीय इतिहासात प्रथमच अभूतपूर्व संकट निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना फेसबुक लाईव्हमधून उत्तर दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर बातम्या येत आहेत. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे का? मुख्यमंत्री भेटत का नाही? मुख्यमंत्री भेटत नव्हते. हे सत्य होते. याचे कारण मुख्यमंत्री म्हणजेच मी गेल्या काही दिवसांपूर्वी माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नंतरच्या दोन-तीन महिने मी कोणालाही भेटणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही, हा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केली आहे.

ते पुढे म्हणाले की, माझी पहिली कॅबिनेट मीटिंग हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंतलेले शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदू आणि हिंदूत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, म्हणूनच पंधरा दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेन.

शिवसेना बदलल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, पण मी असे काय केले आहे? बाळासाहेब २०१२ मध्ये वारले. २०१४ साठी आपण एकाकी लढत होतो. त्यावेळी आपण हिंदू होतो आणि आजही आहे. एकट्याच्या ताकदीवर प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले. आमदार झाल्यानंतर त्यातले काही नंतरचे मंत्री झाले हे सुद्धा शिवसेना बाळासाहेबांनंतरची शिवसेना होती. त्यानंतरच्या आतापर्यंतची वाटचाल आणि आता गेली अडीच वर्षे मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारी ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेमधील आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नकोय तर काय करायचं, गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती. मी त्यांना आपलं मानतो ते मानतात का नाही ते मला माहित नाही असेही ते म्हणाले.

ज्याने घाव घातले जाताहेत त्याच्या वेदना अधिक आहेत. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोरे जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदच होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -