विवाह जुळवणुकीतून आर्थिक फसवणूक!

Share

मीनाक्षी जगदाळे

विवाह! प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आणि सोळा संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार. जुन्या चालीरीतीनुसार पंचक्रोशीमधील, नात्यामधील, माहितीतील मुला-मुलीशी विश्वासू मध्यस्थ, नातेवाईक यांच्यामार्फत विवाह जुळविले जायचे आणि बहुतांश वेळा ते यशस्वी व्हायचे. विवाहात कोणतीही समस्या उद्भवलीच, तर ती मध्यस्थी असलेली माणसं, जेष्ठ, नातेवाईक यांच्या सल्ला मसलतीने सोडवलीही जायची. कालांतराने विवाह जुळवणे हा एक मार्केटिंगचा, पैसा कामविण्याचा, व्यावसायिक तसेच जाहिरातीचा भाग बनला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, इंटरनेटवरील वेबसाइट, वर्तमानपत्रातील जाहिराती, वधू-वर मेळावे, लग्न जमविणारे दलाल म्हणजेच एजन्ट हे अस्तित्वात आले. त्यातूनही अनेक यशस्वी लग्न जुळवून आणण्यात आली. अशा पद्धतीने जुळविलेल्या लग्नांनाही बऱ्यापैकी आधार, विश्वास ज्याच्यामार्फत लग्न जमले त्यांच्यामार्फत मिळायचा. अशा लग्नाची जबाबदारी घेणे, विश्वासाहार्यता टिकवून ठेवणे यात अनेकजण यशस्वी झाले. अनेक विवाहोच्छुकांना मनासारखा जोडीदार या माध्यमातून मिळाला.

आताच्या जमान्यात विवाह जुळविण्यासाठी, जमविण्यासाठी अनेक आधुनिक माध्यमांचा उपयोग केला जातो. यामध्ये दोन विवाहोइच्छुकांचं भलं करून, योग्य मार्गाने फक्त पैसा कमवणे, नाव कमवणे, व्यवसाय करणे हा हेतू नसून चक्क वधू अथवा वराची, त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक करून पळ काढणे यासारखी गुन्हेगारी वृत्ती दिसून येऊ लागली आहे. समुपदेशन दरम्यान अथवा मार्गदर्शनासाठी आलेल्या अनेक प्रकरणांतून हे लक्षात येते आहे की, खूप मोठ्या संख्येने विवाह इच्छुकांची आर्थिकम भावनिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग, समाजात बदनामी यासारखे प्रकार घडत आहेत. वधू-वरांची वय जास्त होऊन गेलेली असल्यास, ते उत्तमरीत्या सेटल नसल्यास, नोकरी-व्यवसायात स्थिर नसल्यास, रंगरूपाने डावे असल्यास, पहिली फारकत झालेली असल्यास, विधवा अथवा विदुर असल्यास अथवा त्यांच्यामागे घरचा भक्कम आधार नसल्यास त्यांचे सर्वसामान्य जगरहाटी पद्धतीने लग्न जमवून त्यांना प्रापंचिक आयुष्य सुरू करणे कठीण जाते. जसजसे वय वाढते, संयम कमी होतो, अथवा आई-वडील थकत जातात, एकट्याने आयुष्य काढणे कठीण वाटायला लागते तसतसं लग्न करणे ही निकड बनते आणि त्यासाठी वाटेल ती जोखीम सर्वसाधारण जनतेमार्फत स्वीकारली जाते. कुठेही कोणतीही फसवी जाहिरात वाचून, नोंदणीकृत नसलेल्या विवाह नोंदणी केंद्रात नावं नोंदवून, वेळप्रसंगी दलाला मार्फत पैसा मोजून वधू अथवा वर मिळावा यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असतात. हि मंडळी आंतरधर्मीय, आंतरजातीय वधू विकत घेणे त्याबदल्यात लाखोने पैसे मोजणे यासाठी देखील तयार होतात.

समोरच्याला लग्नाची असलेली निकड, त्याच्या उणीवा लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत असलेली गुन्हेगारी वृत्तीच्या महिला तसेच पुरुष संबंधितांना विविध स्थळे दाखवण्याचा देखावा करतात. ही दाखवण्यात आलेली स्थळे सांगितलेल्या माहितीपेक्षा खूप वेगळी, चुकीची आणि बनावट असतात हे फसवणूक झाल्यावर लक्षात येते. एकच स्थळ अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम करणे, एकाच स्थळाचा वेगवेगळा बायोडाटा, जन्मपत्रिका, फोटो, नावं थोडाफार बदल करून अनेकदा अनेक ठिकाणी वापरला जातो. सर्व काही फायनल झाले आहे, आता लवकरच लग्न लागेल इतपत पद्धतशीरपणे सर्व देखावा करून मोठी रक्कम समोरच्याकडून उकळली जाते. हॉल बुकिंग करणे, बस्ता करणे, लग्नाची खरेदी करणे इथपर्यंत चर्चा केल्या जातात. एकदा अपेक्षित रक्कम हातात आली की दाखवलेली मुलगी, स्थळ, दाखवलेले नातेवाईक, मध्यस्थी सर्वजण स्वतःचे फोन नंबर बदलून गायब होऊन जातात. अशा प्रकरणात दाखविल्या जाणाऱ्या मुली वा महिला यांची पार्श्वभूमी पाहिली असता एक तर त्या घरातून पळून आलेल्या, अल्पवयीन, फसविल्या गेलेल्या, अनाथ, पीडिता, महिला-आधार आश्रम येथून निघून आलेल्या, देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या, लांबच्या गावातून अथवा शहरातून पळवून आणलेल्या, गुन्हेगारीत सहभागी असलेल्या अशाच असतात.

अशा मुलींची चांगल्या घरात फसवून लग्न लावूनदेखील दिली जातात. त्याबदल्यात पैसे देखील घेतले जातात. पण थोड्याच दिवसात काहीही कुरापत काढून ही नववधू पतीचे घर सोडून गायब होते. तिच्या माहेरचे म्हणजेच या पूर्ण कथेमधील तथाकथित कलाकार संबंधित नवऱ्याशी भांडण करून, दमदाटी करून, जाताना घरातील दागदागिने, पैसा, वस्तू यावर हात मारून जातात. परत या मुलीशी अथवा इतरांशी संपर्कसुद्धा होऊ शकतं नाही. हिच मुलगी वा महिला परत नववधू बनून पद्धतशीर दुसरे लग्नही करून घेते आणि नवीन प्रपंच सुरू करते त्याठिकाणी सुद्धा याच पद्धतीने दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून, पैसा कमावून नवीन सावजाच्या शोधात ही टोळी सक्रिय होते. विविध गावांत शहरात सक्रिय राहून या टोळ्या स्वतःचा हेतू साधताना दिसतात. एकमेकांशी घट्ट नेटवर्क, कमिशन टक्केवारी या पद्धतीने यामध्ये महिला, पुरुष सहभागी आहेत.

याही पलीकडे जाऊन अशा फसवणुकीच्या कृत्यामध्ये सहभागी असलेले गुन्हेगार स्थळ पाहण्याचे कार्यक्रम विविध हॉटेलमध्ये नियोजित करतात, त्यानंतरची बोलणी अजून वेगळ्या ठिकाणी करतात आणि पैशाचे व्यवहार दुसऱ्याच शहरात करतात. पैसेही रोख स्वरूपात देणे-घेणे होते. समोरचा गरजू असल्यामुळे या गोष्टीमध्ये कोणतीही सावधानता बाळगत नाही. अशा एजन्ट, किंवा मॅरेज ब्युरोचे कार्यालय जरी दाखविण्यात आले, तरी ते तात्पुरते भाडे तत्त्वावर घेतलेले असते. व्यवहार झाल्यावर तेथून पोबारा केला जातो आणि फसवणूक झालेल्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी कोणीही हाती लागत नाही.

इच्छुक वधू अथवा वर यांना जेव्हा स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येते, तेव्हा त्याबाबत पोलिसांत तक्रार करणे, याविरुद्ध आवाज उठवणे, चारचौघांत या विषयाला वाचा फोडणे सर्रास टाळले जाते. आधीच लग्न जमत नसते, त्यातून फसवणूकीचा प्रकार उघड झाला, तर आपलीच बदनामी होईल, परत लग्न जमणार नाही, आपल्याला समोरचा ब्लॅकमेल करेल, आपल्याकडे पुरावा नाही यामुळे कोणीही याविरोधात कोणतीही कारवाई करायला धजावत नाही. अशा गरजू इच्छुक वधू-वरांची आणि त्याच्या कुटुंबाची हीच कमकुवत बाजू, खचलेली मानसिकता हेरून समाजात या स्वरूपाची गुन्हेगारी बोकाळात आहे. लग्न जमवून देण्याचा अक्षरशः धंदा उघडून, मोठ्या रकमांची मागणी करून मजबूर सर्वसामान्य माणसांना लुबाडलं जात आहे. यामध्ये समाजाला जागृत करताना हाच संदेश द्यावासा वाटतो की, कुठेही शहानिशा केल्याशिवाय, खात्री पाटल्याशिवाय अतिशय व्यक्तिगत विश्वासू माणूस मध्यस्ती असल्याशिवाय आपण या मार्गाने लग्न जुळतील, अशी अपेक्षा करूच नये. तसेच याप्रमाणे जरी कोणाचीही फसवणूक झालेली असेल, तर त्यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाची मदत जरूर घ्यावी आणि आपल्यासारखे अजून लोक फसणार नाहीत, यासाठी जनजागृती करावी. प्रसारमाध्यमातून आपल्या फसवणुकी संदर्भात सर्व माहिती प्रसारित करावी जेणेकरून इतर लोक सावध होतील. अशा प्रकारचे कोणतेही व्यवहार करताना याबाबत जास्तीत जास्त पुरावे तसेच माहिती, संबंधित लोकांचे फोटो, कागदपत्रे, रजिस्ट्रेशन पडताळून पाहावेत.

अशा प्रकारे कोणतीही संस्था, संघटना, व्यक्ती लग्न जमविण्याचा सौदा करीत असल्यास त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र, आयडेन्टिटी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ मागून घ्यावेत. त्यांनी शिफारस केलेल्या स्थळ अथवा वधू यांचेदेखील जन्मदाखला, फारकत असल्यास त्याचे कागदपत्रे, विधवा-विदुर सांगितले असल्यास त्याचा पुरावा, मुले असल्यास त्यांचे पुरावे तसेच त्या स्थळाचा इतिहास, पार्श्वभूमी जाणून घ्यावी. संबंधित मुलगी अथवा मुलगा याचे मूळ गाव, इतर नातलग, त्यांचे शिक्षण, नोकरी व्यवसाय सांगितले असल्यास त्याबाबत पुरावे याची शहानिशा जरूर करावी. या पद्धतीने जुळवलेली लग्न फक्त वैदिक पद्धतीने, कागद करून, मंदिरात लावायला तयार न होता विवाह नोंदणी कार्यालयात त्याची नोंदणी करण्यासाठी आग्रही राहावे. अशा लग्नानंतर फारकत घेणेसाठी दबाव टाकण्यात आला, तर कोर्टामार्फतच फारकत होण्यासाठी आग्रही राहावे. बाहेरच्या बाहेर लिखापढी करून फारकत घेऊ नये. लग्न जमविण्याआधी वधू-वर हे कायदेशीर लग्नाच्या वयात बसत आहेत का? हे तपासणे अनिवार्य आहे. अन्यथा हीच मंडळी लग्नानंतर नाबालिक वधूशी लग्न केले म्हणून लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला म्हणून मुलाला धमक्या देतात. कोणत्याही भूलथापांना बळी पडून स्वतःचे आर्थिक मानसिक तसेच भावनिक नुकसान लग्न जमविण्याच्या प्रक्रियेत होणार नाही याबाबत सदैव सतर्क राहावे.

meenonline@gmail.com

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

40 seconds ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

26 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

33 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago