Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेशिंदे समर्थकांचे बॅनर ठाण्यात झळकले

शिंदे समर्थकांचे बॅनर ठाण्यात झळकले

ठाणे : राज्यात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू असून या राजकारणाच्या केंद्रस्थानी शिवसेना नेते, ठाण्याचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल झाले होते. त्यानंतर मंगळवारी दिवसभर राजकीय गोंधळाची स्थिती होती. आता एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे. अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे ठाण्यातील कळवा परिसरातील काही एकनाथ शिंदे समर्थकांनी आज कळव्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. यामध्ये आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी ‘आम्ही शिंदे साहेब समर्थक’ असा मजकूर लिहून बॅनरवर इतर सर्व शिवसेना नेत्यांचे फोटो वगळून फक्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोन जणांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरमधून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील वगळला आहे.

ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या मदतीसाठी धावून आले असल्याची भूमिका यावेळी शिंदे समर्थक शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आमच्या मदतीसाठी एका हाकेवर धावून येणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहू. एकनाथ शिंदे ज्या पक्षात प्रवेश घेतील त्याला आमचे समर्थन असल्याचेही शिंदे समर्थकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने काही ठिकाणी शिवसेनेकडून शिंदेंच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला गेला. तसेच काही ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदेंविरोधात निदर्शने देखील केली. याच दरम्यान ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयावर किंवा निवासस्थानावर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शिंदे यांच्या घराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र काल दिवसभरात असा कुठलाही अनुचित प्रकार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घडला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -