Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यातील ८० टक्के नगरसेवक शिंदेंसोबत

ठाण्यातील ८० टक्के नगरसेवक शिंदेंसोबत

अतुल जाधव

मुंबई : ठाणे महापालिकेत गेले ३० वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेनेची सत्ता टिकवण्याचे काम हे एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेत महत्त्वाची दिली जाणारी पदे देखील एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच दिली जातात. ठाण्यात एकहाती सत्ता आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना सोडली तर ठाण्यातील ८० टक्के नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जातील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून ठाणे महापालिकेत असलेल्या सत्तेबरोबरच जिल्ह्यातील इतर महापालिकांमधील सत्ता शिवसेनेला गमवावी लागेल अशी दाट शक्यता आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेमध्ये सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना महत्त्व आहे. शिंदे हे मागील बऱ्याच काळापासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाबरोबरच ठाण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेने आपली विजयी पताका सर्वात आधी ठाण्यात रोवली होती. तेव्हापासूनच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाले तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचे पहायला मिळाले.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये एकनाथ शिंदेंचे नावही होते. त्यावेळी ठाणे जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स देखील ठाण्यात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील अशी भूमिका घेतल्याने एकनाथ शिंदेंचे नाव मागे पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम शिवसेनेमधील दुय्यम स्तरातील जबाबदारी सोपवण्यात आली. मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसंदर्भातील समस्यांमुळे कारभार इतर नेत्यांकडे सोपवण्यासंदर्भातील चर्चा सुरू झाल्या तेव्हा सुद्धा शिंदेंचेच नाव चर्चेत आलेले. मात्र या संदर्भातील शिंदे यांची ही अफवा असल्याचे स्पष्ट करत या चर्चांवर पडदा टाकला होता.

आता एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आगामी होऊ घातलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाले तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचे पहायला मिळाले. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. ठाण्यातील शिवसेनेचे बालेकिल्ले असणाऱ्या टेंभी नाका, आनंद मठ, एकनाथ शिंदेंचे निवासस्थान, महानगरपालिका या परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. ठाणे महापालिकेबरोबरच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा जनाधार आहे.

ठाण्यातील भाजपचा मार्ग होणार सुकर…

एकनाथ शिंदे यांनी जर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर ठाण्यात भाजपला फायदा होणार असून यामुळे ठाण्यातील भाजपचा सत्त्तेचा मार्ग देखील सुकर होणार आहे. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे २४ नगरसेवक निवडून गेले होते. तर शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून गेले होते. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले तरी ठाण्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद सुरूच होते. त्यामुळे भाजपसोबत युतीची भूमिका मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात भाजपचा मार्ग अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -