नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून येतेय. गेल्या २४ तासांत १२ हजार २४९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. सोमवारी देशात ९९२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि १७ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख दिसून आला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर वाढून ३.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील २४ तासांत ९ हजार ८६२ हजार रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूमुळे देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ५ लाख २४ हजार ९०३ वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.