Monday, July 8, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखउत्तम आरोग्यासाठी योगा गरजेचा

उत्तम आरोग्यासाठी योगा गरजेचा

पूर्वीच्या काळी ‘खेलोगे कुदोगे तो बनाेगे खराब, पढोगे लिखोगे तो बनोगे नबाब’ असे म्हटले जात असायचे. खेळाला नगण्य महत्त्व देत अभ्यासाला प्राधान्य दिले जायचे. त्यामुळे आपल्या देशामध्ये अभ्यासू मंडळी ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार शिक्षण घेत गेली. शिक्षण उदरनिर्वाहासाठी आवश्यक असल्याचे बालवयापासूनच मनावर बिंबविले जात होते. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या देशाची पिछेहाट होत गेली. अाशियाई तसेच राष्ट्रकुल स्पर्धामध्ये एक-दोन पदके मिळविण्यापुरते आपल्या देशाचे अस्तित्व दिसत असले तरी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अलीकडच्या काळातील काही अपवाद वगळता आपल्या देशाचा खातेफलक कोराच असायचा.

आपल्या तुलनेत लोकसंख्येने व क्षेत्रफळाने कमी आकारमान असलेले देश मात्र पदकतालिकेत गर्भश्रीमंती मानाने व सन्मानाने फिरविताना दिसून यायचे; परंतु अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात मिळणारा पैसा पाहून पालकच आता आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्याचा आग्रह धरू लागले आहेत. सुदृढ शरीरासाठी उत्तम आरोग्य आवश्यक आहे. रुषीमुनींच्या काळापासून, आश्रम शिक्षणप्रणाली असल्यापासून गुरुकुलातील विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण दिले जात असे; परंतु कालांतराने आपणास त्याचा विसर पडला. शरीर स्वास्थ्यासाठी योगा आवश्यक असतानाही भारतीयांचा योगाकडे काणाडोळा होत गेला. शरीर स्वास्थ्याचे महत्त्व आपणाला उशिराने का होईना लक्षात आल्याने आता पदकतालिकेत आपले अस्तित्व ठळकपणे पाहावयास मिळत आहे. देशाच्या राजकारणात अनेक मातब्बर राजकीय घटक दिल्लीच्या राजकारणात व त्या त्या राज्याच्या राजकारणात चमकले आहेत व चमकतही आहेत; परंतु शरीर स्वास्थ्यासाठी व आरोग्य हितासाठी योगाचे महत्त्व कोणाच्या लक्षात येऊ नये किंवा योगाचे गांभीर्य कोणाला समजू नये ही खरोखरीच शोकांतिकाच आहे; परंतु २०१४ पासून देशाच्या नेतृत्वाची धुरा नरेंद्र मोदी या नेतृत्वाकडे गेल्यापासून देशामध्ये अनेक आश्वासक बदल होत आहेत. प्रगतीचा आलेख उंचावत आहे. नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या उत्तम आरोग्याकडे व सुदृढ शरीर संवर्धनाकडे प्रारंभापासून भर दिला आहे. योगाचीही उपयुक्तता नरेंद्र मोदींनी जाणली. २७ सप्टेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच योग दिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. मोदींच्या या प्रयत्नांनी केवळ देशातच नाही तर जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली. त्यातूनच ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ देशांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. २१ जून २०१५ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

त्यानंतर दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर सर्वात जास्त पडतो, त्यामुळे या दिवसाला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणतात. अशा परिस्थितीत, या दिवशी योगाचा नियंत्रित अभ्यास व्यक्तीला दीर्घायुष्य प्रदान करतो. त्यामुळेच हा दिवस योग दिन म्हणून निवडण्यात आला आहे. दरवर्षी योग दिनाच्या दिवशी एक नवीन थीम ठरवली जाते. २०२१ मध्ये ‘be with yoga be at home’ ही थीम होती. या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये योगाची थीम ‘yoga for humanity’ अशी ठेवण्यात आली आहे. शरीर स्वास्थ्यासाठी सुरू केलेल्या या कार्यक्रमाला आता उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. केवळ शासकीय उपक्रम म्हणून नाही तर अगदी मनापासून भारतीय जागतिक योग दिनामध्ये सहभागी होऊ लागले आहेत. एकेकाळी रामदेवबाबा व त्यांच्या अनुयायांपर्यंत ओळखला जाणारा योगा आता शहरी भाग व ग्रामीण भागातही सकाळी उत्साहाने केला जात आहे.

कुटुंबामधील केवळ एक-दोन व्यक्ती नाही तर लहान लहान बालकेही आता सकाळी उठल्यावर न चुकता योगा करताना पाहावयास मिळत आहेत. यंदाही देशाच्या कानाकोपऱ्यांत योग दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. देशाचे केंद्रीय मंत्री देशभरातील ७५ ठिकाणी योगाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आपले आरोग्य सुधारण्यासाठी योगासन महत्त्वाचे आहे. प्रत्येक योगासन वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करते व त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपल्या कुटुंबापासून आपण योगाची सुरुवात केली तरच आपल्याला योगा करण्याबाबत इतरांकडे आग्रह धरता येईल. आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या कुटुंबासोबत योगाने करा. त्यामुळे आपले त्यांच्या सोबतचे संबंध अधिक चांगले होतील. आपल्या एकमेकांच्या भावना आणि सवयी समजून घेण्यास मदत होईल. आपल्या कुटुंबात प्रत्येक वयोगटातील माणसे असतात, त्यांच्यासोबत योगा करण्यात वेळ घालवला, तर आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल. कोणती योगासने करायची ते ठरवा. योगासने करताना एकमेकांचा आधार घ्या. त्यामुळे मन एकाग्र करण्याची सवय लागेल. श्वासनासंबंधीचे इतर प्रश्न देखील सुटतील. आपल्या कुटुंबाला आपल्या समस्या स्वत:हून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यावर मिळणारे उत्तर शांतपणे ऐकून घ्या. आपल्या कुटुंबासोबत बसून योगासने केल्याने दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होईल. आपली चिडचिड, छातीत सतत जळजळणे व सकाळी थकवा जाणवणार नाही. आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. सकाळी सकाळी योगा केल्याने आपल्यासोबत मुलांनाही व्यायाम करण्याची सवय लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. त्यासाठी आपण दररोज योगा करायला हवा. जागतिक योगादिनी सर्वांनी उत्साहात सहभागी व्हा. हा कार्यक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आयुष्याचा एक भाग बनवा. निरोगी जीवनाकडे वाटचाल करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -