Thursday, May 22, 2025

देश

नक्षल हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

नवी दिल्ली (हिं.स.) : छत्तीसगड येथे मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये २ सहायक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहेत. तर या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. या कामावरील लोकांना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुरक्षा प्रदान करतात. नौपाडा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमाराला सीआरपीची टीम या भागात सुरक्षा प्रदान करण्यासाठी निघाली असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला.


नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग शहीद झालेत. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या काऊंटर अटॅकमुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी २० जून रोजी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस असेले नक्षलवादी ठार झाले होते.

Comments
Add Comment