
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदेंना बडतर्फ केले आहे. शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे गटनेत्याला बडतर्फ केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/SMungantiwar/status/1539211974436790272
संबंधित व्हिडीओत त्यांनी म्हटले की, “मला जो काही नियम माहीत आहे, त्यानुसार गटनेत्याच्या अशाप्रकारे हकालपट्टी करता येत नाही. गटनेत्याची हकालपट्टी करायची असेल, तर तुमच्याकडे आमदारांचे बहुमत असावे लागते. आमदारांची संख्या लागते. जिथे आमदारांची संख्याच नाही, तिथे गटनेत्याची हकालपट्टी करायची, हे कायद्यात बसत नाही,” असे मुनगंटीवारांनी म्हटले आहे.