शिबानी जोशी
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेतच; परंतु आजकालच्या काळात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा या सुद्धा महत्त्वाच्या गरजा होऊ लागल्या आहेत. आपल्या देशात या दोन्ही गरजा काही ठिकाणी अत्यंत महागड्या किंवा दुर्गम भागात अजूनही पोहोचू शकलेल्या दिसत नाहीत. संघ नेहमीच दुर्बल, दुर्गम भागात राहणाऱ्या, जगाशी कनेक्ट नसणाऱ्या, आदिवासी लोकांच्या आणि गोरगरिबांची मदत करण्यात पुढे असतो. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठाननी सुरू केलेले डॉक्टर हेडगेवार रुग्णालय याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. याच संस्थेनी नंतर विविध उपक्रम हाती घेतले. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे “सेवांकुर”. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याचं काम सुरू आहे. कार्यकर्ते तिथे जातात, संपर्क ठेवतात, ज्यांना वैद्यकीय शिक्षणामुळे केवळ व्यवसाय नाहीतर सेवाभावी कामही करता येऊ शकतं, अशी भावना काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. वैद्यकीय शिक्षण घेतल्यामुळे फक्त पैसे कमावणे हा हेतू न ठेवता, जी शपथ ते घेत असतात त्यानुसार समाजासाठी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून काही सेवा करावी असं ज्यांना वाटतं ते डॉक्टर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. अशा काही कार्यक्रमांना नाशिकचे डॉक्टर गोविलकर उपस्थित होते आणि त्यांचा या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क आला होता. त्यामधल्या काही डॉक्टरांना असं वाटत होतं की, आपणही डॉक्टर हेडगेवार रुग्णालयासारखं काहीतरी काम करावं. त्या सर्वांचे मेंटोर डॉक्टर तुपकरी होते. तुम्ही विविध भागांचा सर्वे करा आणि पाहा, कुठे अशा प्रकारच्या रुग्णालयाची गरज आहे? असं त्यांनी सुचवलं आणि त्यांनी डॉक्टर विनायक गोविलकर यांचा पत्ता देऊन त्यांना नाशिकला पाठवलं. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आजूबाजूला आदिवासी भाग आहे. त्यामुळे सर्वे केल्यानंतर नाशिकला रुग्णालय काढण्याची गरज त्यांच्या लक्षात आली आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी ही मदत करायचं ठरवलं. सुरुवातीला एका छोट्याशा तिसऱ्या मजल्यावरील जागेमध्ये अशा तऱ्हेचे रुग्णालय सुरू केलं. सुरुवातीला काम कायमस्वरूपी होऊ शकेल की नाही? याची चाचपणी केली आणि शक्यता आहे हे लक्षात आल्याने मोठ्या जागेचा शोध सुरू केला. भोसला या संस्थेशी संपर्क केला आणि त्यांनी नाशिकपासून दूर असलेली पाच एकर जागा उभारणीसाठी देऊ केली. पहिली तीन वर्षं छोट्या स्वरूपात काम केल्यानंतर ऑक्टोबर २०१० ला इथलं काम सुरू झालं आणि हातात काहीही पैसा नसताना आणि एकही डॉक्टर नाशिकचा नसताना ४० हजार स्क्वेअर पुढच्या बांधकामाला सुरुवात केली. चांगलं आणि प्रामाणिक काम असेल तर हजारो हात पुढे येतात, त्याप्रमाणे कोणत्याही सरकारी अनुदान न घेता, कर्ज न काढता, कोणतीही आकर्षक स्कीम्स जाहीर न करता १८ महिन्यांत रुग्णालय उभं राहिलं. आणि मार्च २०१३ पासून श्री गुरुजी रुग्णालय सुरू झालं. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ठिकाणी कॅन्सरपासून सर्व वैद्यकीय शाखांतले उपचार आणि ऑपरेशन होतात. कॅन्सरमधील रेडिएशन, केमोथेरपी आणि ऑपरेशन असे सर्व उपचार येथे उपलब्ध आहेत. आता जवळजवळ दररोज पाचशे रुग्णांचे ओपीडीमध्ये उपचार होतात आणि एकूण ३५० इतका कर्मचारी वर्ग आहे. या रुग्णालयाचे काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे इथे काहीही विनामूल्य मिळत नाही तरीही अत्यंत वाजवी दरात नाशिक शहराच्या दराच्या ४० टक्के कमी दरात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे पूर्णवेळ डॉक्टर हा कन्सेप्ट राबवला जातो म्हणजे इथले डॉक्टर बाहेर प्रॅक्टिस करू शकत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांचे इथेच संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं त्याशिवाय बाहेर वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेला बाजार आणि साखली ही संकल्पना नसल्यामुळे येथे बाजारीकरणाला वाव राहत नाही. तिसरे वैशिष्ट्य असं की दानशूर व्यक्ती दान करतात, त्यातील एकही पैसा या रुग्णालयाचे दैनंदिन व्यवहारासाठी वापरला जात नाही, तर नवीन सुविधा, बांधकाम, उपकरण घेण्यासाठी वापरला जातो. कोरोना काळात ४८ खाटा उपलब्ध करून येथे अत्यल्प दरात सेवा देण्यात आली. यापैकी एकाही रुग्णाला बाहेरून रेमडीसिविर, ऑक्सजन आणा असे सांगितले गेले नाही. रुग्णालयाने संपूर्ण औषधोपचाराची व्यवस्था केली होती. या कामासाठी रुग्णालयाला त्यानंतर पुरस्कारही मिळाले आहेत. साधारण एक हजार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. सुरुवातीच्या काळात रुग्णांना नातेवाइकांशी संपर्क ठेवता येत नसे, हे लक्षात घेऊन एका खास डॉक्टरांची नियुक्ती केली होती, जो दररोज रात्री प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकांना त्याच्या तब्येतीची माहिती स्वतः फोन करून देत असे त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये अत्यंत विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं. इतकंच काय हे काम पाहून नाशिकमधल्या काही उद्योजकांनी एकत्र येऊन ८० लाख रुपयांचा एक ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिला.
रुग्णालय सुरू झाल्यानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय मिळाले; परंतु असिस्टंट तांत्रिक सहाय्यक पदावर माणसं मिळणं कठीण झालेलं होतं. त्यासाठी रुग्णालयांने चार वेगवेगळे १ वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम तयार केलेत.या विद्यार्थ्यांना पाच दिवस रुग्णालयात सेवा म्हणजे एक्सपिरीयन्स आणि शनिवार-रविवार शिक्षण अशारीतीने अभ्यासक्रमात प्रशिक्षण मिळत, पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रही दिले जातं. त्यातील काहींना याच रुग्णालयात नोकरी लागते आणि इतरांनाही सहज बाहेरच्या रुग्णालयात नोकरी मिळू शकते.
नाशिक जिल्ह्यात काही आदिवासी पाडे आहेत. रुग्णालय सुरू केले पण काही अत्यंत दुर्गम भागातील लोकांना शहरात येऊन शिवा घेणार परवडत नाही त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन सेवा का पुरवू नये? असा विचार येऊन अभ्यास सुरू केला आणि या पाड्यांवर दररोज गाडी पाठवून उपचार द्यायला सुरुवात केली गेली. आता नाशिक जिल्ह्यातल्या २६ पाड्यांवर रुग्णालयाची गाडी दररोज जाते आणि प्रथमोपचार दिले जातात, ज्याला मोठ्या उपचाराची गरज असेल त्याला तिथून घेऊन येऊन रुग्णालयात उपचार देण्यापर्यंत सर्व काम रुग्णालयाचे कर्मचारी करतात. या पाड्यातल्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया याच पद्धतीने त्यांना घेऊन येऊन विनामूल्य करून देण्यात आली आहे. या पाड्यांमध्ये डॉक्टर, नर्ससह स्टाफ दररोज सकाळी साडेआठ वाजता नाशिकहून निघतो व संध्याकाळी सहा वाजता परत येतो. हे काम करत असताना कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की येथे आरोग्याबरोबरच पाण्याची खूप मोठी समस्या आहे, महिलांचे सबलीकरण होण्याची गरज आहे, या सर्व गोष्टींमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी २०१० मध्ये सेवा संकल्प समिती सुरू केली आणि त्याअंतर्गत ग्रामीण भागातले ६ आयाम घेऊन त्यावर काम सुरू केलं गेलं. त्याअंतर्गत १५ पाड्यांमध्ये बोरवेल करून, त्यावर टाकी लावून, त्याला नळ बसवून पाण्याची सोय करून दिली. रुग्णालयाच्या वतीने संपूर्ण साधनसामग्री दिली जाते आणि गावातील लोक श्रमदान करतात. यामुळे आता गावातील महिलांना डोक्यावर कळशा घेऊन लांबून पाणी आणावं लागतं नाही. त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो, श्रमही वाचू लागले आहेत. मग यातील काही ठिकाणी महिला बचत गट सुरू करून त्यांना शिलाई मशीनही देण्यात आली आहेत. ६-७ पाड्यांमध्ये मंदिर बांधून दिली आहेत. त्यामुळे लोक थोडेफार अध्यात्माला लागून दारू, व्यसन सोडण्याची उदाहरणही दिसून येत आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये चांगल्या तांदळाची शेती होते, या तांदळाला चांगला भाव मिळावा म्हणून त्यांच्या तांदळाची विक्री करण्यासाठी नाशिकमध्ये विक्री केंद्र त्यांना उघडून देण्यात आली आहेत. आणखी एक उपक्रम म्हणजे नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावर विल्होळी ल्हाळे नावाचं एक गाव आहे, तिथे एका दानशूर उद्योजकाने अर्धा एकर जमीन रुग्णालयाला दान केली. या विल्होळी गावापासून आजूबाजूच्या तेरा खेडी आहेत, जिथे एकही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाही, हे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी एक सेंटर उभारून तिथे पूर्णवेळ ओपीडी सेवा केंद्र सुरू करण्यात सुरू करण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे भरवली जातात.
५० जण राहतील असं रुग्ण सेवा सदन बांधण्याचं काम सुरू आहे. कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी किंवा रेडिएशन जवळजवळ दररोज करावं लागतं आणि लांबून लांबून असे रुग्ण येत असतात. अशा रुग्णांना व नातेवाइकाला निवासाची सोय व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्याची गरज लक्षात आल्यामुळे आणखी दीड एकरवर full-fledged कार्डियाक सेंटर आणि कॅन्सर सेवेचा विस्तार करायचे काम हाती घेण्यात आले आहे.
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटक ही आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी ऋग्णालयामार्फत सामाजिक कार्य सुरू करूनही एक सुदृढ समाज घडावा यासाठी कार्य सुरू आहे.