Friday, October 4, 2024
Homeमहत्वाची बातमीयोगाभ्यास ठरतोय मोलाचा

योगाभ्यास ठरतोय मोलाचा

बाबा रामदेव

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची गरज नव्यानं समजली असल्यामुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस यंदा अधिक उत्साह आणि सजगतेनं साजरा होईल यात शंका नाही. देशातच नव्हे तर विदेशांमध्येही योगाभ्यासाचा प्रसार होणं ही भारतासाठी निश्चितच गौरवाची बाब असून यायोगे अवघं विश्व भारताच्या पुरातन संस्कृतीशी जोडलं जात आहे. यानिमित्ताने केलेलं या विषयासंबंधीचं हे विवेचन…

दोन-सव्वा दोन वर्षांपूर्वी कोरोनाची लाट आली. त्याची तीन आवर्तनंही झाली. या लाटेच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेली अनेक घरं आजही चाचपडत जगण्याचा प्रयत्न करत आहेत. गमावलेले लोक परत येणं शक्य नसलं तरी त्या आघातातून धडा घेत, जगण्याचा नवा, निरामय अर्थ समजलेले सुजाण नागरिक आरोग्य रक्षणासाठी आपल्या प्राचीन परंपरेकडे वळत आहेत. योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. योगगुरूंकडून प्रत्यक्ष धडे घेणं शक्य नसलं तरी ऑनलाइन पद्धतीनं योगासनं करणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. थोडक्यात, कोरोनाची आपत्ती ही इष्टापत्ती समजून काहींनी आपल्या विस्कळीत जीवशैलीला आकार देण्याचा, योगाभ्यासाच्या सूत्रामध्ये दिवस बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या सकारात्मक परिस्थितीमध्ये साजरा होणारा यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस निश्चितच महत्त्वपूर्ण म्हणायला हवा. विशेषत: कोरोनाची चौथी लाट येण्याचे संकेत मिळत असताना याचं महत्त्व नव्याने जाणून घेण्याची गरज आहे.

साथीच्या आजाराला अथवा कोणत्याही अस्वास्थ्याला रोगप्रतिकारक क्षमता कमी असणारे लवकर बळी पडू शकतात. म्हणूनच आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्यायला हवा. प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि उद्गिथ यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यासोबतच अश्वगंधा, शतावरी, आवळा, कोरफड, गिलॉय, तुळस आदी औषधी वनस्पतींमुळेही शरीराची आजारांशी, जंतूंशी लढण्याची क्षमता वाढते. अश्वगंधाच्या औषधी गुणधर्मांबाबत आम्ही बरंच संशोधन करत आहोत. याबाबतची कागदपत्रं जगातल्या आघाडीच्या वैद्यकीय जर्नलकडेही पाठवण्यात आली. कोरोना विषाणूचं प्रथिन माणसाच्या शरीरातल्या प्रथिनांमध्ये मिसळल्यानंतर शरीरभर पसरतं आणि विविध अवयवांवर प्रभाव टाकू लागतं. यामुळे अवयव निकामी होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र अश्वगंधामधला मिथॅनॉल हा घटक या विषाणूच्या प्रथिनांचा माणसाच्या शरीरातल्या प्रथिनांशी होणारा संपर्क टाळतो. म्हणजेच हा घटक या दोहोंमध्ये भिंत उभी करतो. मधुमेहींसाठी गिलॉय प्रभावी ठरू शकतं. यासोबतच कपालभाती, मंडुकासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वक्रासनामुळेही लाभ मिळू शकतात. त्यातही प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोमसारखे श्वसनाशी संबंधित व्यायाम मधुमेहींना कोरोनाविरोधात संरक्षणात्मक कवच देऊ शकतात. हृदयरुग्णांनी अनुलोम-विलोम, भ्रामरी, उद्गिथ केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं विश्लेषण केल्यास मधुमेही, हृदयरोगी, अस्थमाग्रस्त तसंच रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं लक्षात येतं. मात्र असे रुग्ण योगा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून स्वत:चा बचाव करू शकतात.

योगासनं केल्यामुळे बऱ्याच आजारांपासून बचाव होऊ शकतो. मात्र प्राणायाम हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. प्राणायाम हा अत्यंत सोपा व्यायामप्रकार आहे. कोणत्याही वयोगटातली व्यक्ती प्राणायाम करू शकते. यासाठी फार तयारी करावी लागत नाही. सतरंजी किंवा चटईवर बसून शांतपणे प्राणायाम करता येईल. इतकंच नाही, तर खुर्चीवर बसून किंवा चालता-फिरतानाही प्राणायाम करता येतं. प्राणायाममध्ये दीर्घ श्वास घेऊन जलद गतीने सोडावा लागतो. प्राणायामाने श्वसनसंस्था बळकट होते. शरीरातली प्राणवायूची पातळी वाढायला मदत होते. प्राणायामाच्या लाभांबाबतही आम्ही बरंच संशोधन केलं आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर दोन ते पाच मिनिटं प्राणायाम, दोन मिनिटं भस्रिका प्राणायाम, प्रत्येकी पाच मिनिटं कपालभाती आणि अनुलोम-विलोम केल्यास शरीराची शक्ती वाढू शकेल. अनुलोम-विलोम हृदय, मेंदू तसंच मज्जासंस्थेसाठी प्राणायाम सर्वोत्तम आहे.

योगाबद्दल सांगायचं तर हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हायला हवा. योगामुळे काय होत नाही? नियमित योगासनं केल्यास विविध आजारांना प्रतिबंध घालता येतो. इतकंच नाही, तर आजार बरा करण्याची क्षमता योगामध्ये आहे. यामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आजारही दूर होऊ शकतात. योगामुळे तुमचं आत्मबल, मनोबल, शरीरबल आणि बुद्धिबल वाढतं. आयुष्यातली अशक्य वाटणारी उद्दिष्टं साध्य करण्याचं बळही योगामुळे मिळतं. रुग्णांसाठी योग एक उपचारपद्धती आहे, तर सर्वसामान्यांसाठी योग ही जीवनशैली आहे. योगा हे विशिष्ट प्रकारचं कर्मकांड किंवा पूजेची पद्धतही नाही. अध्यात्माशी जोडलं जात असलं तरी योगाला शास्त्रीय आधार आहे. तुम्हाला १५ ते २० किलो वजन कमी करायचं असेल तर योगाभ्यास सुरू करा. उच्च रक्तदाबाची औषधं कायमची आणि पूर्णपणे बंद करायची इच्छा असेल, तर योग सुरू करा. याही पुढे जाऊन मी म्हणेन की रोगमुक्त, व्यसनमुक्त, औषधमुक्त व्यभिचार-दुराचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगाचा आधार घ्यायला हवा. रोगमुक्त आयुष्य हा योगामुळे मिळणारा प्राथमिक लाभ आहे.

अधिक विस्ताराने सांगायचं तर आपली सूर्यमाला या प्रचंड मोठ्या ब्रह्मांडाचा एक छोटासा भाग आहे. आपल्या आकाशगंगेत ४० हजार कोटी सूर्य आहेत. इतकंच नाही, अशा जवळपास दोन लाख कोटी आकाशगंगा आहेत. आपल्या शरीरातल्या छोट्यातल्या छोट्या पेशीमध्ये एका सेकंदात काही लाख प्रकारच्या क्रिया, प्रक्रिया सुरू असतात. हे सगळं रहस्यमय आहे. हे रहस्यमय जग समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे योग. योग ही जीवन आणि जगातली गहिरं सत्य जाणून घेण्याची एक प्रक्रिया आहे. शरीरापासून सुरू होणारा योगाचा प्रवास पुढे मन, प्राण, आत्मा आणि परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. योग म्हणजे नराचा नारायण, जीवाचा ब्रह्म होण्याची साधना. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यापैकी एक शारीरिक तर दुसरा मानसिक आहे. तिसरा पैलू आध्यात्मिक आणि आपल्या आत्म्याशी जोडला आहे. हे आपल्या चेतनेचे बहुविध पैलू आहेत. आपलं शरीर कोणत्याही रहस्यापेक्षा कमी नाही. आपल्याला येणारी झोप, मेंदूचं-मूत्रपिंडाचं कार्य थक्क करून सोडतं.

जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या, यशस्वी व्यक्तीच्या निरोगी असण्याला जास्त महत्त्व आहे. व्यक्ती कितीही यशस्वी, श्रीमंत असेल, तिने विश्वविजय मिळवला असेल; मात्र शरीर साथ देत नसेल तर या सगळ्या वैभवाचा काहीच लाभ होत नाही. अशा व्यक्तीला कॅन्सर झाला किंवा मूत्रपिंडं, यकृत निकामी झालं, हृदयविकाराचा झटका आला तर अशा जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणूनच सर्वात आधी आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवं. सर्वांनी बलवान, बळकट व्हावं असं मला वाटत नाही. पण प्रत्येकाने निरोगी रहायला हवं, अशी माझी इच्छा आहे. योगामुळे आपल्या आत दडलेलं ज्ञान विकसित होतं. आपल्या मेंदूची क्षमता प्रचंड आहे. आपण एक लाखांपेक्षा अधिक पुस्तकांमधलं ज्ञान मेंदूत साठवून ठेऊ शकतो. मेंदूच्या विकासात योग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. योगा आपली बौद्धिक चेतना जागवतो. आपल्या हुशारीला नवी धार चढते. मन चंचल असतं. या चंचल मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा करायला हवा. सध्याच्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य बिघडण्याच्या काळात योगसाधनाच योग्य मार्गावर नेऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -