केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक ट्विट
मुंबई : “शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.” असे खळबळजनक ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
यावर आता शिवसेना कोणमी भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. याआधीही ठाकरे आणि राणे यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर आले आहेत. मात्र आता या वादात राणेंनी उडी घेतल्याने पुढील राजकीय खेळी काय असतील, यावर चर्चांना उधाण आले आहे.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 21, 2022
राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत २५ पेक्षा अधिक आमदार असल्याचे समजते. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.