Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेना फुटणार! एकनाथ शिंदे २५ आमदारांसह नॉट रिचेबल

शिवसेना फुटणार! एकनाथ शिंदे २५ आमदारांसह नॉट रिचेबल

महाविकास आघाडी सरकार अडचणीत

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये पोहचले आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे हे २५ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथे त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.

कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे २५ आमदार नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचे केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेच्या काही आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, काही आमदारांचे फोन नॉट रिचेबल लागले आहेत. काही आमदारांची यादी मिळाली आहे. हेच आमदार एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेतच फुट पडतेय की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वर्षा बंगल्यावर याची कुणकुण लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश दिले गेले. पण काही आमदार नॉट रिचेबल असल्याचे लक्षात आले. शिवसेनेतील धुसफूस समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

हे आहेत नॉट रिचेबल आमदार

  • साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
  • सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
  • उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
  • पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
  • बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
  • मेहकरचे आमदार संजय गायकवाड
  • बाळापूरचे आमदार नितीन देशमुख
  • सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
  • पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
  • औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
  • कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
  • वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
  • भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
  • महाडचे आमदार भरत गोगावले

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -