मुंबई : नाराज शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत विकास फाटकही आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नाही. यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.