Sunday, July 14, 2024
Homeअध्यात्मसर्व कर्ता राम

सर्व कर्ता राम

ज्याला प्रपंच नाही करता आला ।
त्याचा परमार्थ ढिला पडला ॥
मातापिता यांचे न पाहावे दोष ।
हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥
माता-पितरांचे समाधान ।
हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥
आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते ।
आपले दुःखीपणाने ते दुःखी होते ।
आपली आनंदी वृत्ति आईला
आनंदी बनविते ।
म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात ।
काहूर न माजू द्यावे चित्तात ॥
शब्दाने करावे त्यांचे समाधान ।
उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥
नोकरी चाकरी उद्योग धंदा ।
पोटाकरिता करणे आहे सदा ॥
आपण पैका मिळवावा पुष्कळ ।
पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥
प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये ।
तसे शब्द बोलू नये ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे ।
कोणास विन्मुख न पाठवावे ॥
निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥
अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे ।
त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥
ज्याला प्रपंच नाही करता आला ।
त्याचा परमार्थ ढिला पडला ॥
प्रपंचाची काळजी ।
हीच परमार्थाला वाळवी ॥
परमात्म्याचा आधार ज्याला ।
ठाव नसे काळजीला ॥
शेजार असता रामाचा ।
दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥
मी कोण हे जाणले ज्याने चित्ती ।
त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥
राम त्राता हा भाव ठेवावा चित्ति ।
निर्भयता होईल याच रीती ॥
ज्याने देह केला रामाला अर्पण ।
त्याला नाही काळजीचे कारण ॥
कर्ता राम हे आणता चित्ति ।
पापपुण्याची नाही त्याला भीती॥
ज्याचा परमात्मा झाला सखा ।
त्याला नाही कोठे धोका ॥
‘कर्ता मी’ म्हणे आपण ।
हे सर्व दुःख काळजीचे कारण ॥
झाले ते होऊन गेले ।
होणार ते चुकेना कोणाला भले ॥
म्हणून नाही करू काळजीला ।
राम साक्षी आहे त्याला ॥
जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥
राम त्यास सांभाळता ।
काळजीस कारण न उरले आता ॥
मुलाबाळांची न करावी काळजी ।
रामराय करावा राजी ॥
आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती ।
काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥
शक्यतो करावे नामस्मरण ।
आपली काळजी न करावी आपण ॥
रामाचा म्हणून प्रपंच केला ।
काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥
भगवंत असता पाठीराखा ।
काळजीची काय कथा ॥
सतत ठेवावे एक चित्तीं ।
न सोडावा रघुपति ॥
सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
नेमात नेम उत्तम जाण ।
रामावाचून न राहावे आपण ॥
सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -