सीमा दाते
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागते. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते, मुंबईची तुंबई होते, रस्त्यांवर खड्डे, लोकल बंद अशा अनेक अडचणींचा सामना दरवर्षी मुंबईकरांना करावा लागतो. यासाठी दर पावसाळ्यापूर्वी पालिका मुंबईचा आढावा घेते, अनेक पावसाळी तयारी पालिका करत असते यात पाणी तुंबू नये म्हणून नालेसफाई, रस्त्यांची कामे, खड्डे बुजवणे, पम्पिंग स्टेशन अशी अनेक कामे पालिका करते. मात्र ही कामे केल्यानंतरही मुंबईकरांचा त्रास काही कमी होत नाही.
यावर्षीही मुंबई महापालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. पालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर पालिकेने उशिराने नालेसफाईची कामे हाती घेतली. एकूण १६२ कोटींची लहान आणि मोठ्या नाल्यांची सफाईची कामे पालिकेने सुरू केली. यंदा पालिकेने उशिराने नालेसफाईची कंत्राटे दिल्यानंतर भाजपसह विरोधकांनी अनेक वेळा टीका देखील केली होती. मात्र मुंबईत १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पालिकेचे दावे किती खरे ठरणार हे पावसानंतर समोर येईलच.
गेल्यावर्षी देखील पालिकेने असेच दावे केले होते. मात्र पहिल्याच पावसात ते दावे खोटे ठरले होते. त्यामुळे यंदा काय परिस्थिती उद्भवणार हे येणारी वेळच सांगेल. यंदा मुंबईत ३८६ फल्डिंग स्पॉट आढळले होते. या स्पॉटवर काम करून पालिकेने यांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे पाणी सचण्याची ठिकाणे कमी झाली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे, तर पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये आणि गटार लहान नाले तुंबू नये यासाठी एकूण ४८७ पंप पालिकेने बसवले आहेत. यापैकी शहरात १८७, पश्चिम उनगरात १६५ आणि पूर्व उपनगरात १२४ पंप लावण्यात आले आहेत, तर ६ महत्त्वाचे पम्पिंग स्टेशन तयार आहेत, तर २ मिनी पम्पिंग स्टेशन गांधी मार्केट आणि हिंदमाता परिसरात तनात करण्यात येणार आहेत. वडाळा, महालक्ष्मी या परिसरातही पम्पिंग स्टेशन तयार केले आहेत. विशेष म्हणजे पाणी तुंबल्यानंतर मुंबईत मुंबईतील ६ अग्निशमन केंद्रावर ६ रेस्क्यू बोट, १२ कायाक, ४२ लाईफ जॅकेट, उपलब्ध केले जाणार आहेत, तर कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द, घाटकोपर येथे नौदलाची ५ बचाव पथके तैैनात केली जाणार आहेत, तर एनडीआरएफच्या तीन तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत.
आता विषय हा आहे की, महापालिकेने ही सगळी तयारी केल्यानंतर मुंबईत पाणी तुंबणार नाही का? दरवर्षी पालिका अशीच कामे करत असते. नालेसफाई करते, मिठी नदीची स्वच्छता करते मात्र पहिल्याच पावसात गेल्या वर्षी पालिकेचे दावे पाण्यासोबत वाहून गेले. त्यामुळे या पावसाळ्यात महापालिकेने केलेले दावे तरी खरे ठरणार आहेत का? एकीकडे भाजपने आधीपासूनच नालेसफाईच्या कामावरून पालिकेला धारेवर धरले होते. मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आढावा भाजपच्या नगरसेवकांकडून घेण्यात आला होता त्यानंतर पालिकेला नालेसफाईच्या कामातील त्रुटींचं पत्र देखील देण्यात आले होते. दरम्यान नालेसफाई कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने अधिकाऱ्यांची ‘भरारी पथके’ नेमली आहेत, तर या भरारी पथकाने आठवड्यातून दोन वेळा आपला फीडबॅक देणेही अपेक्षित आहे. नालेसफाईच्या कामात अनियमितता होऊ नये यासाठी कंत्राटदारांनी नदी व नाल्यातून गाळ काढल्यावर तो गाळ सुकल्यानंतर त्याच ठिकाणी त्या गाळाचे वजन करण्यात येईल. तसेच, तो गाळ नियोजित ठिकाणी टाकताना त्या ठिकाणीही त्या गाळाचे वजन करण्यात येते. या सर्व कामांचे चित्रीकरण करण्यात येते. तसेच जीपीएस यंत्रणा वापरण्यात येणार आहे. कोणी आक्षेप घेतल्यास त्यांना ते दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान नालेसफाई करताना मुंबईच्या नाल्यातून २०२० साली ३.५६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. गतवर्षी २०२१ साली ४.३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. तरीही मुंबईची तुंबई झाली होती. त्यामुळे यावर्षी ही तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मात्र कोणत्याही नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना दिसले नाहीत. दरवर्षी सत्ताधाऱ्यांकडून नालेसफाइच्या कामांचा पाहणी दौरा करण्यात येतो. मात्र यावर्षी केवळ भाजपचा आक्रमकपणा नालेसफाईच्या कामाबाबाबत पाहण्यात आला आहे. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देखील पाहणी करण्यात आली. सध्या जून महिना सुरू झाला असूनही मुंबईत पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा आहे. पण मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर मुंबईची परिस्थिती काय असेल कुणास ठाऊक, पण पालिकेने केलेली कामे ही दिसली पाहिजेत हे नक्की अन्यथा सगळे दावे फोल ठरतील.