Sunday, October 26, 2025
Happy Diwali

आसाममध्ये पावसाचा कहर

आसाममध्ये पावसाचा कहर

आसाम (वृत्तसंस्था) : आसाममध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाच हजारांपेक्षा जास्त गावे पाण्याखाली गेली आहेत. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. दरम्यान बचावकार्यासाठी गेलेले चार पोलीस वाहून गेले. या पावसाचा ३२ जिल्ह्यांना फटका बसला आहे. नागरिकांप्रमाणे जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. आसाममधील ४२ लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसला आहे.

बचावकार्यादरम्यान आलेल्या पोलिसांपैकी चार पोलीस पुरात वाहून गेले असून यापैकी एका पोलिसाचा मृतदेह सापडला, तर अन्य तीन पोलीस बेपत्ता आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

या पुरामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत. नागरिकांची तारांबळ उडून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हालाखीची झाली आहे. लष्कराच्या जवानांचे बचाव आणि मदतकार्य सुरूच असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे.

Comments
Add Comment