सांगली : सांगलीमधील मिरज येथे मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये दोन कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवले. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत येथील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.