कुपवाडा (हिं.स.) : काश्मीर खोऱ्यात ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत अडथळा निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. खोऱ्यात गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यासह या वर्षात आतापर्यंत एकूण ११४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत सात दहशतवाद्यांना ठार केले असून त्यात कुपवाडामध्ये ४, कुलगाममध्ये दोन आणि पुलवामामध्ये एकाचा समावेश आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी कुपवाडामध्ये ४ दहशतवाद्यांनाही अटक केली आहे. मारले गेलेल्या आणि पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब भागात रविवारी दुपारपासून सोमवार सकाळपर्यंत चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाबमध्ये ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी आहे. त्यांनी सांगितले की, लोलाबमध्ये सुरक्षा दलांनी शौकत अहमद शेख या दहशतवाद्यालाही अटक केली होती, त्यानेच चौकशीत कुपवाडा येथे हे दहशतवादी लपल्याची माहिती दिली होती.
यासंदर्भात आयजीपी म्हणाले की, रविवारी सकाळी कुलगामच्या धिपोरा भागात पहिल्यांदा चकमक सुरू झाली. रविवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, तो स्थानिक असल्याचे सांगितले जातेय. पुलवामामध्ये सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. ते म्हणाले की, गेल्या दहा दिवसांत सुरक्षा दलांनी २४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या वर्षात आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात ३२ परदेशी दहशतवाद्यांसह एकूण ११४ दहशतवादी मारले गेले आहेत.