मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाच बांधकाम व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. राजेश सावला, अश्विन मिस्त्री, जयेश रामी, जयेश शाह आणि मंगेश तुकाराम सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. रहिवाशांची पर्यायी व्यवस्था न करणे, भाडे न देणे, याशिवाय पैसे घेऊनही फ्लॅट न देणे, यासारख्या असंख्य तक्रारी आहेत. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून तीन प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अंधेरी येथील ‘गौरव लिजंड’ या बांधकाम प्रकल्पामध्ये ३० ते ३५ ग्राहकांनी २०११ मध्ये फ्लॅट बुक केले. या प्रकल्पचे प्रमुख जयेश शाह यांच्यासोबत करारनामा करून या ग्राहकांनी १२ कोटींच्या पेक्षा अधिक रक्कम जमा केली. २०११ पासून अद्यापपर्यंत शाह यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नसून त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्याही घेतलेल्या नाहीत. दहा वर्षांनंतरही पैसे देऊन घर मिळत असल्याने या ग्राहकांनी पोलिसांत तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूक तसेच मोफासह इतर कलमांतर्गत शाह याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच शाह फरार झाला होता. पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ आणि उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांच्या पथकाने त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शाह याच्यावर अशाच प्रकारचे फसवणुकीचे १० गुन्हे दाखल आहेत.
कांदिवलीच्या चारकोप येथील शिवगंगा सोसायटीमधील एकच फ्लॅट अनेकांना विकून त्यांची फसवणूक करण्यात आली. एका सेवानिवृत्त व्यक्तीने मेसर्स राज आर्केड अँड एन्क्लेवज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांकडून ७६ लाख रुपयांना फ्लॅट खरेदी केला. मात्र खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हा फ्लॅट अन्य एका व्यक्तीला आधीच विकण्यात आला असून त्यावर कर्जही घेण्यात आले आहे. हे लक्षात येताच ग्राहकाने चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार केली. तपासादरम्यान हाच फ्लॅट अनेकांना विकण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय काटे यांच्या पथकाने ग्राहकांना फसविणाऱ्या राजेश सावला, अश्विन मिस्त्री आणि जयेश रामी या तिघांना शोधून काढले.
पवई येथील शिवालिक व्हेंचर्सच्या एका प्रकल्पात मंगेश सावंत याच्या सांगण्यावरून रमाकांत जाधव यांनी १५ कोटी रुपये गुंतविले. मात्र २००८पासून हा प्रकल्प अर्धवट स्थितीतच असून मंगेश याने ही रक्कम स्वतःसाठी वापरली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरिवली येथून मंगेश सावंतला अटक केली.