कोरोनानंतर देहूवरून संत तुकारामांची पालखी २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार, त्यानिमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे हे स्मरण.
मृणालिनी कुलकर्णी
सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी तळागाळातल्या लोकांना सहज समजतील, अशा रचना केल्या. पंढरपूरचे श्री विठ्ठल हे संत तुकारामांचे आराध्य दैवत. अनेक संत होऊन गेले तरी संत तुकारामांचे विचार, तत्त्वज्ञान, श्रेष्ठ व समाजाला पुढे नेणारे असल्याने बहिणाबाईंनी संत तुकाराम हे विठ्ठल भक्तीच्या मंदिरावरचा कळस आहे, असे म्हटले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, तर तुकोबाराय कळस झाले. त्यामुळेच ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करतात.
इंद्रायणीच्या नदीत बुडवलेली तुकारामाची गाथा तेरा दिवसांनी कोरडी वर आली.
। तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम। या चमत्काराबरोबरच नदीकाठच्या लाखो जनसमुदायाच्या मुखी गाथेतील अभंग होते. आजही सर्वश्रुत आहेत. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज लोकसंत होते.
महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू गावी वसंत पंचमीला तुकारामांचा जन्म झाला. या घराण्यात विठ्ठलभक्ती पूर्वापार होती. वडील नित्यनेमाने पंढरपूरची वारी करायचे. हे बालमनावर रुजले. हरिकथा, भजन, कीर्तनात बालपण गेले. खरं तर तुकाराम हे सर्वसाधारण संसारी माणूस. संपन्न सावकारी घराण्यात जन्मलेल्या तुकारामांनी वैभव उपभोगलेही होते; परंतु बावीसाव्या वर्षी आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा एकापाठोपाठ साऱ्यांचा वियोग पाहिला. प्रापंचिक सुख किती क्षणभंगुर असते. तुकोबा लिहितात, या जगात ।‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एव्हडे’। दुष्काळात चांगली चालणारी दुकानदारी उद्ध्वस्त झाली. ।‘जग हे दिल्या घेतल्याचे; अंतःकाळी नाही कोणी।’. जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता. नाना प्रकारच्या आपत्तीतून त्यांना नव्या वाटेचा शोध लागला. काही काळ एकांतात घालविल्यावर लक्षांत आले, पांडुरंगाशिवाय कोणी नाही.
‘। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरूनिया’। तरीही आयुष्याच्या या उलटलेल्या डावात पळून न जाता, स्थितप्रज्ञ दृष्टीने दुःखातून वैराग्याच्या वाटेवर गेले. विवेकाने स्वतःचा तोल सांभाळला. नियतीपुढे माणूस किती दुबळा आहे हे स्वतः अनुभवले.
‘। आलिया भोगासी, असावे सादर’। गावापासून दूर भंडारा डोंगरावर अंतर्मुख होऊन विचार केला, वाचन केले. निसर्गाचेही महत्त्व शब्दांत मांडले ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी…’ भक्तिमार्गाचे वाटसरू होण्याचे ठरविताच तुकाराम या साधकाने पहिली गोष्ट ही केली. घेतलेली कर्ज, गहाणखते इंद्रायणीत बुडविली. सावकारी मोडीत काढून गरिबांचे कर्ज माफ केले. हा निष्काम कर्मयोग होता. गुरुउपदेशाच्या दृष्टांताने अभंग लिहिले. तुकारामांनी स्वतःत आमूलाग्र बदल केला. अहंकार नष्ट होऊन अंगी नम्रता येण्यासाठी लोकांची हलकी कामे केली. सारे मोह सोडले. ऐन तारुण्यात असाधारण आचार-विचाराची पेरणी केली. त्याचा पाया सामाजिक परिवर्तनाचा होता.
“। दया करते जे पुत्रासि, तेच दासा आणि दासी।”. हा समानतेचा संदेश त्यांनी पाळला. परोपकारी धोरणामुळे लोक तुकारामाला वेडे समजू लागले. जोपर्यंत माणूस वेडा होत नाही, तोपर्यंत कार्य सिद्धीस जात नाही. सामान्यातून तुकाराम महाराज असामान्य होत गेले.
‘। तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा’।
तुकोबाने नामदेवाची परंपरा खांद्यावर घेऊन जनजागृतीचे वादळ निर्माण केले. त्या काळात ढोंगी संतांचा सुळसुळाट होता. देवाधर्मातील अनागोंदी लोकांनी ओळखावी, यासाठी तुकोबा रोखठोक आघात करतात,
१. ‘ । टिळा टोपी घालून माळा, म्हणती आम्ही साधू; दयाधर्म चित्ती नाही, ते
जाणावे भोंदू।’
२. ‘। संत झाले फार, पोटासाठी फिरती दारोदार।’.
३. ‘। भले तरी देऊ कासेची लंगोटी; नाठाळाचे माथी, देऊ काठी।’
चौकात रांगोळी काढून देव्हारा बसवितात, हे कर्मकांडाचे विकृत रूप आहे. जनतेस खरा भागवत धर्म समजावून सांगताना केवळ कुलधर्म म्हणून काहीच करू नका. शुद्ध भाव आणि त्याला समांतर कर्म म्हणजे खरे आयुष्य. परब्रह्म येथेच भेटतो.
तुकोबांना समाजकंटकांनी खूप त्रास दिला, अन्याय केला, तरीही तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात माणुसकीचा ओलावा होता नि प्रेम, अहिंसेचीच शिकवण होती.
प्रापंचिक माणसांना तुकोबा समजावून सांगतात, ‘। शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी।’ विचार, कृती चांगली असेल, तर (बीज तसे फळ), येणारे फळ उत्तमच उपजते. देवाला मानसपूजा समजते. जे भोग प्राप्त होतात, ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. निष्ठेने, प्रेमाने, श्रद्धेने आपल्याला येईल तसे रामकृष्णहरी हे नामस्मरण करा. लोकहो! प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यास आवश्यक आहे. ‘। प्रपंच करोनि परमार्थ साधावा; वाचे आळवावा पांडुरंग’।
तुकाराम महाराज संसारी असूनही ते परमार्थाकडे वळले. ‘। अवघाचि संसार केला ब्रह्मरूप; विठ्ठलस्वरूप म्हणोनिया.’। रात्रंदिवस विठ्ठलाशी काया, वाचा, मनाने एकरूप झालेले तुकोबाराय लिहितात, “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी…”
विठ्ठलाचे ते सुंदर ध्यान माझे सर्वसुख आहे. विटेवर उभा असलेला माझा देव विठ्ठल…! त्याच्या चरणी माझे मन सदैव राहू दे!
पांडुरंगा! मला लहानपण दे! मुंगी होऊन साखर खायला मिळते.
साखरेची गोडी सांगून कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुकाराम महाराज लोकांशी सतत बोलत होते. त्यांनी लोकजीवन न्याहाळले. भले-बुरे अनुभव घेतले. ‘बोले तैसा चाले’ हे त्यांचे ब्रीद होते. प्रत्येक अभंगाचा अर्थ अस्सल आहे. म्हणूनच अभंगातील शब्दांना वेगळेच तेज, प्रतिष्ठा आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत जगाला विचारधन वाटले. ते म्हणतात, चंदनासारखे गंधित व्हावे, तो गंध वाटावा. म्हणून कपाळी गंध नि हातावर गोपीचंदाची मुद्रा लावतो.
‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या वचनाप्रमाणे वागून सर्वांसाठी स्वानुभवाचे दालन खुले केले. तुकाराम महाराजांच्या मानवता आणि परोपकारी भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने संतपदी पोहोचले. त्यांचा संदेश हा साऱ्या झगडण्याचा परिपाक होय. म्हणूनच प्रज्ञावान ज्ञानेश्वराने तेराव्या शतकात भागवत धर्माची पताका महाराष्ट्राच्या देशी उभारली “। ज्ञानदेवाने रचिला पाया।…” आणि सतराव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात तुकारामांच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा उमाळा या मातीतून पुन्हा वर आला म्हणून
“। तुका झालासे कळस।…”…