अॅड. रिया करंजकर
सोशल मीडिया नेटवर्क व इतर आधुनिक सुख-सुविधा व आरामदायी आयुष्य या सगळ्यांचा परिणाम तरुण पिढीवर होत चाललेला आहे. त्यातच भर म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. आपल्या मुलांना सगळ्या सुख-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून दिवस-रात्र कष्ट करणारे आई-वडील त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होऊन आपली मुलं काय करतात, याकडे आई-वडिलांचे कमी होत चाललेले दुर्लक्ष आणि या सर्वच गोष्टींचा परिणाम हळूहळू नवीन पिढीवर होत चाललेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती डोकाऊ लागलेली आहे.
आजकाल सर्वच आई-वडील आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून नावाजलेल्या शाळेमध्ये भरघोस डोनेशन देऊन मुलांना अॅडमिशन घेत आहेत. आपल्या मुलांच्या भविष्याचा हे पालक विचार करत आहेत. पण, आपल्या मुलांच्या भविष्याबरोबर त्यांचं आयुष्यही त्या शाळेमध्ये किती सुरक्षित आहे, याचा मात्र विचार कुठलेही पालक करत नाहीत. नामांकित शाळेमध्ये घडलेला प्रसंग… प्रायमरी शाळेमध्ये शिकत असलेला तन्मय अतिशय चंचल असा मुलगा. अभ्यासात तेवढाच चांगला. नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला. शाळेची असेम्बली सुरू होण्याअगोदर त्याने आपली बॅग आपल्या बेंचवर ठेवली व फ्रेश होण्यासाठी तो वॉशरूमच्या दिशेने निघून गेला. असेम्ब्ली संपली तरी तो आला नाही. काही वेळाने काही मुलं वॉशरूमकडे गेली असता त्यांना तन्मय रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्या ठिकाणी गेलेल्या बसच्या क्लिनरने त्याला त्या अवस्थेत उचलून शाळेच्या व्यवस्थेचे मंडळींसोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. यानंतर त्या ठिकाणी शहरातले पोलीस आले व त्यांचं तपासकार्य सुरू झालं. तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये तन्मयला मृत घोषित केलं. तन्मयला चाकू मारून त्याचा खून करण्यात आला होता. आता कोणी केलं, त्याचा तपास जलदगतीने सुरू झाला होता. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघितले असता त्या दिशेने बसचा क्लीनर गेलेला दिसला. तपास पथकाने त्या क्लीनरला आपल्या ताब्यात घेतलं. त्यावेळी बसचा ड्रायव्हर आणि इतर बस ड्रायव्हर असा दावा केला की तो क्लिनर काहीच करू शकत नव्हता. कारण तो एक साधा भोळा असा माणूस होता आणि नुकताच तो नोकरीला लागलेला होता आणि मुलाचा खून करून त्याला काय फायदा होता. तर सोशल मीडिया आणि त्याला आपल्या पद्धतीने मनोरुग्ण घोषित केलं होतं आणि मनोरुग्ण असल्यामुळे त्यांनी हा खून केला असावा, असा अंदाज सोशल मीडिया करत होती. तो क्लीनर मात्र ओरडून-ओरडून मी निर्दोष आहे, असं सांगत होता. शाळेच्या प्रशासनाला वाचवण्यासाठी विकास सामान्य माणसाचा बळी पोलीस घेत होते, पण त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हता. उलट त्याने जखमी झालेल्या मुलाला उचलून स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, हे मात्र सोशल मीडियाच्या लक्षात येत नव्हतं आणि ज्यावेळी खून झाला, त्यावेळी शाळेमध्ये परीक्षांची धामधूम सुरू होती. अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत कसं पाठवायचं या दडपणाखाली आलेले होते. काही पालकांनी तर ऐन परीक्षेच्या वेळी अॅडमिशन कॅन्सल करून दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेली होती, कारण या शाळेमध्ये आपली मुलं सुरक्षित नाहीत, असे या पालकांना वाटू लागलेलं होतं. पोलीस आपला तपास चालू ठेवलेला होता. आता हे प्रकरण सीबीआयकडे गेलेलं होतं. परत पहिल्यापासून चौकशीला सुरुवात केली, यावेळी तन्मय वॉशरूमच्या दिशेने गेलेला होता. त्यावेळी वॉशरूमच्या दिशेने कोण कोण गेलं होतं, याची कसून चौकशी सीबीआयने सुरू केली आणि त्या वेळेस त्याच्या लक्षात आलं की, ज्या चाकूने तन्मयवर वार झालेले होते तो चाकू वॉशरूममध्ये सापडलेला होता. एवढ्याशा पुराव्यावरून सीबीआयची तपास गती सुरू झाली.
वॉशरूमला जाण्याअगोदर तिथे अगोदरच कोणीतरी जाऊन बसलेला होता, असा दाट संशय सीबीआयला आला. त्या दिशेने आपलं काम सुरू केलं. त्यावेळेस सीबीआयच्या असं लक्षात आलं की, शाळेच्या बाहेरची व्यक्ती गुन्हेगार नसून शाळेस मधलं कोणीतरी असणार, असा दाट संशय सीबीआयला आला. त्यामुळे शाळेची चौकशी सुरू झाली. या सर्व गोष्टींसाठी फार वेळ लागत होता, कारण पूर्ण शाळेची चौकशी करणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती. गुन्हेगार फार हुशार होता. गुन्हा करून उथळ माथ्याने तो आजूबाजूला फिरत होता. शाळेच्या एवढा स्टाफमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगार कसा शोधायचा हे चॅलेंज आता सीबीआयच्या समोर होते. सीबीआयला पोलीस तेवढं सहकार्य करत होते. छोट्या तन्मयचा खून कोणत्या गोष्टीसाठी केला गेला? त्यात तन्मयचा या गुन्हेगारांशी काय संबंध या सगळ्या गोष्टींचा सीबीआय आणि पोलीस तपास सुरू झाला होता. तपास कार्यांमध्ये सीबीआयला खरा गुन्हेगार सापडला आणि तो होता अकरावी वर्गात शिकत असलेला अक्षय हा विद्यार्थी. प्रथम दर्शनी हा एका मोठ्या सराईत गुन्हेगाराचा गुन्हा आहे, असं सीबी आणि पोलिसांना वाटत होतं की, कारण त्याप्रमाणे त्या छोट्याशा तन्मयवर वार झालेले होते. एक सराईत गुन्हेगार करू शकतो, त्यामुळे सीबीआय आणि पोलिसांचे लक्ष फक्त प्रौढ व्यक्तींकडे होतं, विद्यार्थ्यांकडे नव्हतं. त्यामुळे तपास गतीला एवढा वेळ लागत होता. अक्षयची कसून चौकशी केली असता त्याने असं सांगितलं की, परीक्षेचा काळ सुरू होता आणि परीक्षेचा पेपर पुढे जावा आणि पालकांना शाळेत बोलू नये म्हणून मी हा गुन्हा केला की, ज्यामुळे शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील. एवढ्याशा कारणासाठी एका लहान मुलाचा बळी गेलेला होता. अक्षयने एका घरातील एकुलता एक मुलगा हिरावून घेतलेला होता. अक्षयमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आली तरी कुठून एखादी गोष्ट टाळण्यासाठी त्याने एवढा मोठा गुन्हा केला होता, तोही एक विद्यार्थी होता, तर याचं मागचं सर्व कारण सोशल मीडिया हेच होतं. आजकालची मुलं सोशल मीडियावर जास्त राहतात व नको त्या गोष्टी त्यांच्याकडून पाहिल्या जातात व ऐकल्या जातात आणि तीच कृती त्या आपल्या खऱ्या आयुष्यात करायला बघतात. अक्षयने तन्मयचा बळी घेऊन परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यात का? नाही… परीक्षा तशाच चालू होत्या. कारण इतर मुलांचं भविष्य त्या परीक्षेवर अवलंबून होतं. खून केला होता ते साध्य झालं होतं का, तर नाही. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा अक्षयच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळी पडलेला होता.
नासमंजस वयात गुन्हेगारी प्रवृत्ती मुलांमध्ये येते तरी कुठून? हा प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा राहिला आहे. याचं कारण जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असणे हेच उत्तर या घडीला मिळू शकते. शालेय प्रशासन श्रीमंताच्या मुलाला लपवून एका साध्या क्लीनरला गुन्हेगारी घोषित करण्याचा प्रयत्न करत होती.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत.)