Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीतुरळक पावसातही दरड कोसळण्याचा धोका कायम

तुरळक पावसातही दरड कोसळण्याचा धोका कायम

चेंबूरमधील दुर्घटनेत दोन जखमी

घाटकोपर (वार्ताहर) : मुंबईत डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याचे तुरळक पावसातही अधोरेखीत होत आहे. चार दिवसांपूर्वीच पालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागातील साकीनाका परिसरातील काजुपाडा येथे डोंगराचा काही भाग कोसळून एका घराचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा चेंबूर येथील आरसीएफ भागातील भीम टेकडी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळून त्यातील दगड एका घरावर पडून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा धोक्याच्या ठिकाणच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने डोंगर पायथ्याखाली धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तुरळक पावसामुळे अशा घटना घडत असतील तर मोठ्या पावसात काय होईल? ही भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. साकीनाका आणि चेंबूरच्या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी धोक्याची टांगती तलवार केवळ या भागातीलच नाही तर मुंबईभरातील धोकादायक घरांवर कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

दरम्यान, चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम टेकडी, न्यू भारत नगर, आरसीएफ, वाशीनाका येथील टेकडीचा काही दगडी भाग एका घरावर कोसळला. त्यामुळे या झोपडीत मोठे दगड सरकत येवून अरविंद अशोक प्रजापती आणि आशिष अशोक प्रजापती हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी जाऊन त्यांनी मदत केली. याबाबत आरसीएफ पोलिसांनी अपघाताची माहिती नोंदवली आहे. तपास अधिकारी म्हणून निरीक्षक विलास दातार हे काम पहात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -