मातीच्या सुवासाने दरवळणारा गंध हा पहिल्या
पावसाचं मग्न रूप दर्शविणारा. आता चार
महिने बरसणार आहे, हे आश्वासन देणारा. पण आता
ते आश्वासन कुठे विरलंय माहीत नाही…
प्रियानी पाटील
पाऊस मृगाचा… जणू आश्वासनाने भारलेला. अगदी नंतर दडी मारून बसेल पण मृग नक्षत्राला पाऊस अगदी आश्वासन दिल्याप्रमाणे हजर होईल ही शाश्वती असतानाही यावर्षी पाऊस जवळपास येता येता लांबला की काय असे चित्र दिसून आले.
मृग नक्षत्रास पाऊस ठरल्यावेळी येतो म्हणतात. अगदी आश्वासन दिल्याप्रमाणे येतो. दिल्या आश्वासनाला जागतो आणि संपूर्ण प्राणीमात्रांना जगवतो. याची एक आख्यायिका सांगितली जाते. एका कथेतून याची प्रचिती येते.
मृग नक्षत्र म्हणजेच मृगाच्या कहाणीत एक हरणांचा कळप तळ्याकाठी पाणी पित असताना एका शिकाऱ्याने त्यांच्यावर बाण रोखला. हे पाहून हरणं घाबरली आणि शिकाऱ्याला आपणास न मारण्याची विनवणी केली. मात्र शिकाऱ्याची मुलं घरात उपाशी असल्याकारणाने त्याने शिकार मागे घेण्यास नकार दिला.
मात्र जशी शिकाऱ्याची मुलं होती, तशीच वाट पाहणारी हरणांची देखील पिल्लं होती. मरणाआधी त्या हरणांना आपल्या पिलांना भेटण्याची आस लागली. त्यांनी शिकाऱ्याला विनवणी करून आम्ही आमच्या पिल्लांना डोळे भरून बघून येतो, मग तू आम्हाला मार असे सांगितले. मात्र शिकाऱ्याच्या हातची शिकार घालवायला शिकारी मूर्ख नव्हता. त्यामुळे त्याने या गोष्टीसाठी नकार दिला. मात्र मृगांच्या डोळ्यांत आपल्या पिलांना भेटण्याची अास होती. मरणाआधी पिलांना भेटण्यासाठी हरणं काकुळतीला आली. मात्र शिकाऱ्याने नकार दिला. यावर मृगांनी शिकाऱ्याला पक्कं आश्वासन देत, आपण ठरल्यावेळी या जागी पुन्हा मरणासाठी हजर राहू, पण आता आम्ही पिलांना भेटून येतो. अशी विनवणी केली. शिकाऱ्यानेेही त्यांना जाऊ दिले. आश्वासन किती पाळलं जाईल याची शिकाऱ्याला शाश्वती नव्हतीच, तरी पण तो आपल्या घरी आपली मुलं उपाशी राहतील, शिकार तर घेऊन जावीच लागणार म्हणून रात्रभर तिथेच बसून राहिला. एकदा हातची शिकार निसटून गेल्यावर वाट पाहण्यात खरं तर काय अर्थ म्हणून तो निराश तर झालाच. पण दुसऱ्याक्षणी आश्वासन दिल्याप्रमाणे ती हरणं पुन्हा त्याच्या दिशेने त्याला येताना दिसली. त्यांच्या येण्याने त्याच्या जीवात जीव आला. मरणासाठी सज्ज झालेले ते जीव आपल्या पिलांना भेटून, त्यांची समजूत काढून ठरल्या जागी, ठरल्या वेळी शिकाऱ्याला आश्वासन दिल्याप्रमाणे हजर राहिले होते. तेही शिकाऱ्याच्या पिलांची भूक भागावी म्हणून… ते पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला हरणांची दया आली आणि त्याने त्या हरणांना जीवदान दिले.
आयुष्याच्या वाटेवर इमानदारीने मरणासाठी आलेली हरणं काळाच्या ओघात माणसाला बरंच काही सांगून जाणारी ठरली. इतकेच नव्हे तर मृग नक्षत्र म्हणजेच हे लाखमोलाचं आश्वासन जे पावसाच्या रूपाने आपण आजवर अनुभवत आलो, ठरल्यावेळी ठरल्या दिवशी मृग नक्षत्राचा पाऊस येतोच येतो असे म्हणतात. आख्यायिकेप्रमाणेच अनुभव देऊन जातो, मृगाचा शिडकावा करून जातो. आश्वासनांचा हा पाऊस माणसाच्या जीवनात गारवा, चैतन्य आणतो.
पावसाळी ऋतूच्या आगमनाची चाहुल देणारे मृग किडेही किती मखमली. ही मखमल मातीच्या गंधात तुरूतुरू चालतानाचं रूप गावाकडे अनुभवता येतं बरेचदा. तुडुंब भरून आलेल्या विहिरी यावेळी समाधान पावलेल्या दिसतात. काेरडी शुष्कता, जमिनींना गेलेले तडे, सुकी काष्ट झालेली झाडे, रिकाम्या घागरीनी खडखडणारी घरे, उन्हाच्या तिरीपीने भिरभिरणारी मने यावेळी मृगाच्या पावसाने समाधान पावून जातात. विशेषत: कोकणात पावसाचा शिडकावा अनेकदा होताना दिसतो, शहरात पावसाची प्रतीक्षा करावी लागतेय. उकाड्याने हैराण झालेल्या माणसांना हा आश्वासनाचा पाऊस कधी अनुभवायला मिळेल माहीत नाही.
मातीच्या सुवासाने दरवणारा गंध हा पहिल्या पावसाचं मग्न रूप दर्शविणारा. आता चार महिने बरसणार आहे, हे आश्वासन देणारा. पण आता ते आश्वासन कुठे विरलंय माहीत नाही. पाऊस माणसावर रुसला आहे का, माहीत नाही. मृगाच्या चाहुलीने दरवळणारा मृत्तिका गंध मनासारखा श्वास भरून घेता आला नाही, पाऊस खरंच आपलं आश्वासन विसरला का?
पावसाच्या बरसणाऱ्या धारा, कोसळणाऱ्या जलधारा, त्याची तल्लीनता, संथता तर कधी रौद्रता अशी अनेक रूप अनुभवास मिळतात. पण पावसाची पहिली चाहुल साऱ्यांनाच हवीहवीशी वाटून जाणारी असते. ओंजळभर पाण्यासाठी केलेल्या वणवणीवर हा आश्वासनांचा पाऊस खरं तर लाख मोलाची भेट देऊन जाणारा असतो, असंच म्हणावं लागेल.
आश्वासनाचं माहीत नाही, पण ओंजळभर पाण्यासाठी फिरणाऱ्या पावलांना यामुळे दिलासा नक्की मिळेल. शेतात डौलदार पिकाने शिवार डोलेल. धबधबे फुलून येतील. फुलांचे ताटवे, निसर्गाची तल्लीनता यानिमित्ताने अनुभवास मिळेल. आषाढ श्रावणाचं रूप नजरेत सामावेल… पण सारं काही पावसाच्या आगमनानंतर. सध्या पावसाची हुलकावणी इतकंच!