दीपक परब
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, तर कंगना राणावतच्या ‘धाकड’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली आहे. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच चित्रपटगृहांमध्ये जात नसल्याने चक्क शोच रद्द करण्यात आले आहेत. पण याउलट ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली.‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने ७ दिवसांमध्ये फक्त ५५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे काही शो रद्द देखील करण्यात आले. मोठा गाजावाजा केलेल्या कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचीदेखील तीच अवस्था होती.कंगनाचा चित्रपट पाहण्यासाठी एकही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये नसल्याने या चित्रपटाचेही शो रद्द करण्याची वेळ आली आहे.पण याउलट मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून दहा दिवसांत या चित्रपटाने १८.०३ कोटींचा गल्ला जमवला. अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटानेही विक्रमी कमाई केली. या ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ८.७१ कोटींची कमाई केली. एकूणच काय तर बिग बजेट चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
राधिकालाही आलेत विचित्र अनुभव…
प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने बॉलिवूडचे धक्कादायक सत्य जगासमोर आणले आहे. चित्रपटात काम करायचे असेल तर आपण कसे दिसतो? आपली शरीरयष्टी कशी आहे? याकडे अधिक लक्ष दिले जाते. हे कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या तोंडून ऐकलेही असेल. राधिका आपटेने आता बॉलिवूडमधील धक्कादायक सत्य सांगितले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने चित्रपट करत असताना आलेल्या वाईट अनुभवाबाबत खुलेपणाने सांगितले. विचित्र कारणं देत बऱ्याच चित्रपटांसाठी राधिकाला नाकारण्यात आले. याबाबत तिने मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वीच तिला एका चित्रपटासाठी नाकारण्यात आले. त्याचे कारणही विचित्र होते. माझ्या तुलनेत दुसऱ्या अभिनेत्रीचे ओठ, शरीराची ठेवण अधिक चांगली असून ती अभिनेत्री तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक दिसतेय आणि ती खूप चालेल असे सांगण्यात आले’. राधिकाला तिच्या करिअरच्या सुरुवातीला देखील अनेक वाईट अनुभव आले. शरीररचनेवर काम करण्याची गरज आहे, असा सल्ला देखील तिला देण्यात आला होता. राधिकाने याबाबत सांगितले की ‘जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला माझ्या शरीरयष्टीवर काम करण्याचा सतत सल्ला दिला जायचा. सुरुवातीला मी दबावाखाली जगले. पहिल्याच भेटीमध्ये नाकाची सर्जरी कर असे मला सांगण्यात आले, तर दुसऱ्या भेटीमध्ये स्तनाची सर्जरी करण्याचा सल्लाही देण्यात आला’. आता बोला…
अबुधाबीच्या पॅलेसमध्ये हिनाचे ग्लॅमरस फोटोशूट
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान ही सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून हिना प्रसिद्धीझोतात आली. सध्या हिना परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. अबुधाबी येथील ‘एमिरेट्स पॅलेस’ हे भव्य पॅलेस प्रसिद्ध असून हिनाने येथे बिनधास्त फोटोशूट केले आहे. फोटोमध्ये हिनाने वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. पॅलेसमधील हिनाचे हे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. तिने फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. एमिरेट्स पॅलेसमध्ये ग्लॅमरस हिनाचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या पॅलेसमधील एका रुमचे भाडे हजारोंच्या घरात आहे. या आलिशान पॅलेसमध्ये एका दिवसासाठी तब्बल २८ हजार ६४७ रुपये मोजावे लागतात.