रमेश तांबे
एकदा काय झालं कावळ्याला सापडला आरसा. त्यानं पाहिलं त्यात डोकावून, तर पार गेला चक्रावून. कारण बघतो तर काय आरशात होता कावळा, त्याच्यासारखाच काळा आणि थोडा थोडा सावळा. कावळा आरशात बघून हसला आणि तिथेच फसला. कारण, आरशातला कावळा करायचा त्याची नक्कल. पण कावळ्याला नव्हती तेवढी अक्कल! मग कावळ्याने मारली आरशाला टोच, तर आरशातल्या कावळ्यानेही मारली चोच. एक नाही, दोन नाही अगदी दहा वेळा मारून मारून टोच, दुखायला लागली चोच! पण आरशातला कावळा काही दमला नाही.
मग त्याने विचार केला, आरशाला घेऊन जाऊ गावाला. तिथं दाखवू सर्वांना! कावळ्याने आरसा चोचीत धरला, गावाकडे आपल्या लगेच निघाला. उडता उडता तो होता बघत, आरशातला कावळा होता त्याच्यासोबत. थोड्याच वेळात तो कावळ्यांच्या गावात पोहोचला, “लवकर या लवकर या”, सगळ्यांना सांगत सुटला. सगळे कावळे जमा झाले, कावळ्यांचे झाड काळे काळे झाले. मग कावळा म्हणाला, “या आरशातही आहे एक कावळा, आपली नक्कल करतो बावळा. मारायचा त्याला फार प्रयत्न केला, पण मला काही जमेना, म्हणून पकडून आणलाय त्याला.”
तेवढ्यात काव काव असा आवाज घुमला, कावळ्यांचा राजादेखील आला. मग कावळ्याने आरसा फांदीला टांगला. सगळ्यांना आरसा दिसत होता चांगला. प्रत्येकाने आरशात दोन मिनिटे बघायचे, आरशातल्या कावळ्याला चोचीने मारायचे असे भारी नियम ठरले. पण कावळे ते कावळे. कितीजणांना नियमच नाही कळले. काहीजण एकदमच उडाले, आरशावर सारे तुटून पडले. कितीतरी जणांनी टोच मारली, त्यामुळे आरशाची काचच फुटली. आता तर कावळे आणखी घाबरले, कारण फुटलेल्या आरशात त्यांना खूप कावळे दिसू लागले. हा प्रकार बघून सारेच घाबरले. काही कावळे तर लांब उडून गेले. मग कावळ्यांचा राजा ऐटीत पुढे आला. फुटलेला आरसा त्याने लांबून बघितला. आरशात त्याला दिसले भरपूर कावळे, त्याला वाटले शत्रूच आहेत सगळे!
राजा मनातून घाबरला खूप, पण तो बसला नाही चूप. सैन्याला त्याने दिला लढाईचा आदेश, काहींना पाठवला तातडीचा संदेश! मग काय असंख्य कावळे आरशावर तुटून पडले. त्या झोंबाझोंबीत आरशाचे छोटे-छोटे तुकडे पडले. त्यातही कितीतरी कावळेच दिसू लागले.
आता मात्र राजा खूपच घाबरला. काय करावे हेच त्याला कळेना. तेवढ्यात त्याला आपल्या हुशार राणीची आठवण झाली. मग आरशाचा एक तुकडा घेऊन राजा निघाला. महालात येऊन त्याने तो तुकडा राणीला दाखवला. त्याची राणी होती खूप हुशार! तिने पुस्तके वाचली होती हजार! हसत हसतच राणी म्हणाली, हा तर आहे आरसा, बरे झाला तुम्ही आणला. मला नट्टापट्टा करायला चांगला. ही गोष्ट राणीच्या दासींकडून साऱ्यांना कळली. तशा सगळ्या कावळ्यांच्या बायका धावल्या अन् आरशाच्या तुकड्यांवर तुटून पडल्या!